Pimpri: वायसीएम रुग्णालयात दीड कोटीचे फर्निचर बसविणार 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात नवीन फर्निचर बसविण्यात येणार आहे. त्यासाठी दीड कोटी रूपये खर्च होणार आहे. तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.  स्थायी समिती सभेत आयत्या वेळी या विषयाला मंजुरी देण्यात आली.

 संत तुकारामनगर येथे पिंपरी – चिंचवड महापालिकेचे 750 खाटांचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. या ठिकाणी औद्योगिकनगरीसह आजुबाजूच्या ग्रामीण भागातून तसेच राज्याच्या इतर भागातूनही हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. रूग्णालयात अस्थिरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, दंतरोग, कर्करोग असे विविध विभाग आहेत. या रूग्णालयात आठ प्रकारच्या विशेष सेवा उपलब्ध आहेत. त्यामध्ये कॉर्डीओलॉजी, युरोलॉजी, न्युरोसर्जरी, न्युरोलॉजी, पेटीयाट्रीक सर्जरी, हॅण्ड आणि प्लास्टीक सर्जरी, हदय, मुत्रपिंडे, मज्जासंस्था अशा प्रकारच्या सुविधांचा समावेश आहे. दररोज शेकडो रूग्ण बाह्यरूग्ण विभागात उपचार घेतात. रूग्णालयात दररोज दाखल होणा-या रूग्णांचे प्रमाणही मोठे आहे. गंभीर रूग्णांवर उपचार करण्याकरिता रूग्णालयात दोन अतिदक्षता विभाग सज्ज आहेत.

रूग्णालयातील काही विभागातील फर्निचर जीर्ण झाले आहे. त्यामुळे रूग्णालयात आता नवीन फर्निचर बसविण्यात येणार आहे. त्यासाठी ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. निविदा दर दोन कोटी 25 लाख रूपये अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार, चार ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी आर्टीरिअर इन्फ्रा सोल्युशन्स इंडीया या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 23 टक्के कमी म्हणजेच 1 कोटी 56 लाख रूपये दर सादर केला. इतर ठेकेदारांपेक्षा आर्टीरिअर इन्फ्रा या ठेकेदाराचा दर लघुत्तम असल्याने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही निविदा स्वीकारण्यास 3 ऑक्टोबर रोजी मान्यता दिली. त्यांच्यासमवेत करारनामा करण्यास स्थायी समिती सभेत आयत्या वेळी मंजुरी देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.