Pune : राज्याची सर्वसमावेशक प्रगती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध – आदित्य ठाकरे

क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीने महाकॉन -२०२० चे आयोजन

एमपीसी न्यूज – राज्याची सर्वसमावेशक प्रगती करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. म्हणूनच राजकारणी आणि बांधकाम व्यावसायिक यांनी एकमेकांच्या विश्वासाने काम केल्यास आपलं राज्याला सर्वस्तरावर पुढे नेऊ शकतो, असा विश्वास कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. पर्यावरणपूरक बांधकामांना सर्वात आधी प्राधान्य दिले जावे. पर्यावरणाचा समतोल साधत पायाभूत सुविधांचा विकास केला जावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

क्रेडाई महाराष्ट्र यांच्यावतीने दोन दिवसाचे राज्यस्तरीय अधिवेशन ‘महाकॉन २०२०’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. गृहनिर्माण क्षेत्रासमोरील आव्हाने आणि गृहनिर्माण क्षेत्राच्या भविष्यासाठी योजना यासंदर्भातील यावेळी चर्चा झाली. ५७ शहरातील ७०० हुन अधिक  सदस्यांनी यात सहभाग घेतला. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे,आमदार ऋतुराज पाटील व रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमास लाभली.

क्रेडाई नैशनलचे अध्यक्ष सतीश मगर, चेअरमन जक्षय शहा,उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष राजीव परीख, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट,अनंत राजेगावकर यांच्या हस्ते महाकॉन २०२०’अधिवेशनाचे उद्धघाटन झाले. याचसोबत भारतीय अब्जाधीश गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या व्हाईस प्रेसिडेंट रचना भुसारी, सीए विपुल लाठी आदी वक्त्यांचे मोलाचे मार्गदर्शन यावेळी सर्वांना लाभले.याशिवाय महरेराचे प्रमुख गौतम चॅटर्जी महारेराची अंमलबजावणी याविषयी आपली मते मांडली.

आदित्य ठाकरे म्हणाले, आपल्या कामाच्या गुणवत्तेवर बांधकाम व्यावसायिकांनी आपली प्रतिमा निर्माण करावी. त्यातूनच ग्राहकांचे समाधान जपले जाईल जे सर्वाधिक महत्वाचे आहे. पर्यावरण पूरक कामे व्हावीत अशी सरकारची इच्छा आहे.मेट्रो सारख्या सुविधा आपण मोठया शहरांमध्ये निर्माण करत असलो तरी छोट्या शहरांसाठी देखील अशा सुविधा कशा देता येतील याचा विचार करणे आवश्यक आहे.

‘मिशन रोजगार’ ही संकल्पना संपूर्ण राज्यभरात राबविण्याचा मी प्रयत्न करणार आहे. याशिवाय समान बांधकाम नियम करणे ही काळाची गरज आहे.तसेच विकसकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आमची बँकांशी चर्चा चालू आहे.एसआरए स्कीम्स मध्येही मोठ्या बदलाची आवश्यकता आहे. याची जाणीव सरकारला आहे. हौसिंग संदर्भातील काही अडचणी निश्चितच आहेत त्यावर आपण एकत्रितपणे उत्तर शोधू असेही ते म्हणाले.

आमदार रोहित पवार म्हणाले, बांधकाम व्यवसाय इतर अनेक विषयांशी जोडले आहेत.या क्षेत्राची मोठी पकड राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आहे. त्यामुळेच या क्षेत्राला भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू. याशिवाय आमदार ऋतुराज पाटील यांनी सोशल मीडिया विषयीची आपली मते यावेळी मांडली. सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. त्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यासच आपण तळागाळातील लोकांपर्यंत अधिक सक्रियतेने आपली कामे पोहचवू शकतो.

यावेळी सदस्यांना प्रगत बांधकाम प्रणाली, स्थावर मालमत्ता, करांची रचना, आर्थिक शिस्त आणि यासंबंधातील ग्राहकांचे हित, व्यवसाय बांधिलकी यासर्वांवर उपयुक्त मार्गदर्शन सर्वांना मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.