Lonavala : आमचं ठरलंय…जो कमळाचे निशाण घेऊन येईल त्याच्यामागे उभे राहायचंय – रावसाहेब दानवे

माणसाला नाही तर चिन्हाला पाहून मतदान करा

एमपीसी न्यूज – जो कमळाचे निशाण घेऊन येईल त्याच्यामागे उभे रायचंय असं आमचं ठरलंय…तुम्ही सुद्धा माणसाला नाही तर चिन्हाला पाहून मतदान करा, असा सल्ला भाजपाचे केंद्रीयमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मावळातील बुथप्रमुखांच्या विजयी मेळाव्यात भाजपा कार्यकर्त्यांना दिला. मावळात बुथ प्रमुख, पन्नाप्रमुख यांनी वातावरण खराब होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन देखील भाषणाचा समारोप करताना केले.

यावेळी कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य अविनाश बवरे, तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे, ज्येष्ठ नेते शंकरराव शेलार, बाळासाहेब जांभुळकर, सोपानराव म्हाळसकर, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, भाजयुमोचे माजी अध्यक्ष रवींद्र भेगडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संदीप काकडे, माऊली शिंदे, एकनाथ टिळे, निवृत्ती शेटे, ज्ञानेश्वर दळवी, जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ वारींगे, चंद्रकांत शेटे, पंचायत समिती सभापती सुवर्णा कुंभार, उपसभापती जिजाबाई पोटफोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊ गुंड, शांताराम काजळे, युवक प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, गुलाब म्हाळसकर, शांताराम कदम, बाळासाहेब घोटकुले आदीसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रात भाजपात सुरु असलेल्या मेगा भरतीविषयी बोलताना या मेगा भरतीची कधी कधी भीती वाटते की मेगा भरती एक दिवस आम्हाला बाहेर काढेल, अशी मीश्किल टिप्पणी दानवे यांनी केली. दानवे म्हणाले जुन्या कार्यकर्त्यांनी नव्या कार्यकर्त्याना शिंग मारु नये, त्यांना सांभाळून घ्या, भाजपा हा महासमुद्र आहे. येथे अनेक नद्या येऊन मिळतात. सर्व पाणी समुद्रात एकत्र होतं तसं काम करा, इतर पक्षातून चांगली लोकं आल्याशिवाय आपला पक्ष वाढणार नाही. आम्ही कोणालाही धमकावून पक्ष प्रवेश देत नाही, आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राज्यभरात प्रवेशाची मेगा भरती सुरु आहे. मला मावळात काळे झेंडे दाखविले जाणार, असे समजले होते. मात्र येथेतर राष्ट्रवादीत काळे झेंडे दाखवायला देखील कोणी शिल्लक नाही.

भाजपाचा विचारांचा कार्यकर्ता

भाजपाचा कार्यकर्ता हा विचाराला बांधलेला कार्यकर्ता आहे तर काँग्रेसचा कार्यकर्ता हा माणसाला बांधलेला कार्यकर्ता आहे म्हणून त्यांचे प्रवेश सुरु आहेत. आमचे देशात 2 खासदार असताना देखील कोणी पक्षातून हालले नाही. यांचे 46 खासदार असताना प्रवेश करत आहे. सत्तेत असताना त्यांनी कार्यकर्त्तांना सांभाळंल नाही. त्याच्याकडे माणसे मोठी झाली व पक्ष गरीब झाला या परिस्थितीला काँग्रेसच जबाबदार असल्याची टीका दानवे यांनी केली.

मावळात युतीचा उमेदवार 50 हजार मतांनी विजयी होणार

मावळात उमेदवारी कोणालाही मिळो युतीचा उमेदवार किमान 50 हजार मतांनी विजयी होणार असल्याचा आशावाद राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी व्यक्त केला. भेगडे म्हणाले आम्ही सर्वजण तिकिटाकरिता इच्छुक असलो तरी सर्व जण एकत्र आहोत. आजपण सर्वजण एकाच गाडीत बसून आलो, पुढे देखील एकाच गाडीत येणार, एकाच पक्षात राहणार असल्याचे सांगत मावळात सर्व आल्बेल असल्याचे सांगितले. तसेच विरोधकांवर संधान साधताना आमच्यात बोटं घालू नका नाहीतर बोटं दाखवायला शिल्लक राहणार नाही, असा दम भरला. जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले मावळातील राष्ट्रवादीचे चांगले नेते आमच्याकडे आले आहेत. मावळ राष्ट्रवादीमुक्त करण्याचा विडा आम्ही उचलला होता तो आता पूर्णतःच्या मार्गावर आहे.

रामभाऊ म्हाळगीच्या उदाहरणाने इच्छुकांच्या आशा पल्लवीत

राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळच्या इतिहासाची युवा कार्यकर्त्यांना आठवण करून देताना सांगितले की 1957 साली ज्येष्ठ समाजसेवक नथुभाऊ भेगडे यांना जनसंघाची उमेदवारी जाहीर झाली. सर्वत्र प्रचार कामं व भिंती रंगविल्या गेल्यापण नंतर याठिकाणी रामभाऊ म्हाळगी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. त्यावेळी नथुभाऊ यांच्या रंगविलेल्या भिंती पुसण्यात आल्या हा मावळचा इतिहास युवा कार्यकर्त्यांनी ध्यानात घ्यावा, असा किस्सा सांगितल्याने हा किस्सा नेमका कोणासाठी इशारा होता याबाबत चर्चा रंगली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.