Pimpri: आम्ही मंत्रमुग्ध झालो, पण… नागरिकांना काय उत्तरे द्यायची? 

विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या आयुक्तांच्या खुलाशावर नगरसेवक असमाधानी

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सुमारे तासभर खुलासा केला. वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा, पाण्याची पातळी खालावल्याने गेल्या महिन्यभरापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची कारणीमीमांसा त्यांनी केली. विविध तांत्रिक कारणे सांगितले. परंतु, आयुक्तांच्या खुलाशावर नगरसेवकांचे समाधान झाले नाही. आयुक्तांचा खुलासा ऐकून आम्ही  मंत्रमुग्ध झालो. पण, नागरिकांना आम्ही काय उत्तरे द्यायची असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. सर्वसामान्य जनतेला याचे काही देणेघेणे नाही, असेही नगरसेवक म्हणाले.

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचा विषय महापालिकेच्या 20 ऑक्‍टोबरच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला होता. साडे सहा तास चाललेल्या एकाच विषयावरील चर्चेनंतर प्रशासनाचा खुलासा न घेताच ही सभा तहकूब केली होती. त्यानंतर बुधवारी (दि.31) ही तहकूब सभा पार पडली. महापौर राहूल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

सभेच्या सुरुवातीला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील पाणीपुरवठ्यासंदर्भात प्रशासनाचा खुलासा केला. यामध्ये त्यांनी अनेक तांत्रिक कारणे सभागृहासमोर मांडली. जलसंपदा विभागाकडून सोडल्या जणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन व बंधाऱ्यातून होणाऱ्या उपशाचे नियोजन चुकले आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कायम न ठेवता आल्याने ही समस्या उद्‌भवल्याचा खुलासा त्यांनी केला.

दरम्यान, आयुक्तांच्या या खुलाशावर नगरसेवकांचे समाधान झाले नाही.  हा खुलासा न पटल्याने नगरसेवकांनी  प्रशासनाला धारेवर धरले. आयुक्तांचा खुलासा मंत्रमुग्ध असल्याचे सांगत, असा खुलासा आम्ही प्रभागातील नागरिकांना देऊ शकत नाही. पाणी समस्या दीड महिन्यांपासून नव्हे, तर दीड वर्षांपासून भेडसावत आहे. अशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा हा अपमान आहे, असे भाजप नगरसेविका प्रियंका बारसे म्हणाल्या.

भोसरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर राजकीय दबाव असून, ते व्यवस्थितपणे काम करू शकत नसल्याचे सांगत, आयुक्तांनी या कर्मचाऱ्यांच्या पाठिशी ठाम राहण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित गव्हाणे यांनी केली. तर या प्रश्‍नावर उपाययोजना करण्यासाठी गटनेत्यांची समिती स्थापन करन, या विषयातील तज्ज्ञ व सेवानिवृत्तांची मदत घेण्याची मागणी भाऊसाहेब भोईर यांनी केली.

जलसंपदा विभागाकडून समन्वय ठेवला जात नसल्यास. त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात यावी. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी वेळोवेळी आवाज उठविला जाईल. वेळप्रसंगी आंदोलन देखील केले जाईल असे भाजपचे विकास डोळस यांनी सांगितले.

लक्ष्मण उंडे म्हणाले, आयुक्तांनी केलेल्या खुलाशातील एकही शब्द समजला नाही. आम्ही पाण्याच्या मुद्दयावर निवडून आलो आहोत. परंतु, दीड वर्षात पाण्याचा प्रश्न सोडवू शकलो नाहीत. त्यासाठी वारंवार पाठपुरावा करुन देखील प्रश्न मार्गी लागत नाही याची खंत वाटत आहे.  आम्ही आता जीव द्यायचा का संताप व्यक्त करत ते म्हणाले, सीमेवर लढताना दुश्मनाची कधी भिती वाटली नव्हती. पण आता पाण्यासाठी नागरिकांचा फोन आला की भिती वाटत आहे.

गहुंजे येथील क्रिकेट स्टेडियम आणि लोढा गृहप्रकल्पासाठी पवना नदीमधून पाणी उचलले जात असल्यानेच शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात होत असल्याचा आरोप सचिन चिखले यांनी केला.

चर्चा लांबताच महापौर राहुल जाधव यांनी हस्तक्षेप केला. 24 तास योजनेचे काम सात महिन्यात मार्गी लावावे. अनधिकृत नळजोडणीला आणखीन 15 दिवसाची मुदत देण्यात यावी, असा आदेश त्यांनी आयुक्तांना दिला. तसेच  बांधकाम व्यावसायिकाला पाणी शहराच्या आरक्षित कोट्यातून उचलले जात नसल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.