Sangvi News : वाहतुकीचे नियम पाळायला हवेत – अभिनेते विजय पाटकर

एमपीसी न्यूज – परदेशात वाहतुकीच्या नियमांच्या बाबतीत नागरिक आणि तिथले पोलीस अतिशय सक्त आहेत. रात्रीच्या तीन वाजता रस्त्यावर कुणीही नसेल तरीही तिथले नागरिक वाहतुकीचे नियम पाळतात. पण आपल्याकडे याच्या विरोधात आहे. दुपारी तीन वाजता भर गर्दीत सुद्धा वाहने सुसाट जातात, असे मत प्रसिद्ध सिनेअभिनेते विजय पाटकर यांनी व्यक्त केले. आपल्याकडे वाहतुकीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन देखील पाटकर यांनी केले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून 32 व्या वाहतूक सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात विजय पाटकर बोलत होते. यावेळी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले, पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर आदी उपस्थित होते.

वाहतुकीचे नियम पाळणा-या वाहन चालकांचा अभिनेते विजय पाटकर आणि पोलिसांच्या वतीने पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

विजय पाटकर म्हणाले, “मुंबईकर वाहतुकीचे नियम पाळतात. पोलिसांना बघताच मुंबईकर ब्रेक मारतात. पण या बाबतीत पुणेकर थोडे धीट आहेत. पोलिसांना पाहून ते थांबत नाहीत. मात्र आता पुणेकर सुद्धा घाबरायला लागले आहेत. पुणेकर घाबरतात हेच खूप आहे, असा मिश्किल टोला मुंबईकर असलेल्या पाटकर यांनी पुणेकरांना लगावला.

आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. वाहतुकीचे नियम न पाळणा-यांमुळेच अपघात होतात. वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल. यामुळे आपले जीवन आणखी चांगले होईल, असेही पाटकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.