Pune : महाराष्ट्रात होणार नाही, अशी पुण्यात शिवजयंती साजरी करू – महापौर

19 फेब्रुवारी या एकाच दिवशी शिवजयंती साजरी करण्याचा ठराव मंजूर

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेतर्फे शिवजयंती साजरी करण्यासाठी जे जे करावे लागेल, ते ते करू. शिवजयंती साजरी करताना निधी कमी पडू देणार नाही. आपण सर्वजण मिळून काम करू. जिथे तुम्ही कमी, तिथे आम्ही, असे सांगून महाराष्ट्रात होणार नाही, अशी शिवजयंती पुण्यात साजरी करू, असा निर्धार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला. दरम्यान, या बैठकीत 19 फेब्रुवारी या एकाच दिवशी शिवजयंती साजरी करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी हा ठराव मांडला.

पुणे महापालिकेतर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवानिमित्त बुधवारी बैठक आयोजित केली होती. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक योगेश समेळ, दीपक पोटे, राहुल भंडारे, अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल, कचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक, मराठा महासंघाचे नितीन साळुंके, छावाचे धनंजय जाधव, यावेळी उपस्थित होते.

प्रशासकीय यंत्रणेचा प्रतिसाद मिळत नाही. आजच्या बैठकीला पोलीस उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांची उपस्थिती आवश्यक असल्याचा सूर बैठकीत व्यक्त करण्यात आला. शिवजयंतीच्या तयारीसाठी दोन महिने आधी बैठक व्हावी. मागील 2 वर्षांपासून शिवजयंती महोत्सवाची बैठकच होत नव्हती. मुरलीधर मोहोळ यांनी ही बैठक लावली. शिवसृष्टी त्वरित झाली पाहिजे, पुढील शिवजयंती पर्यंत चांगली बातमी यावी, अशीही मागणी शिवप्रेमी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

19 फेब्रुवारी या एकाच दिवशी शिवजयंती साजरी करण्यात यावी, असा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला. माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी मांडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा ठराव पाठवून देण्यात यावा. या ऐतिहासिक बैठकीत हा ठराव मंजूर केल्याची कल्पना देण्यात यावी, असे सांगण्यात आले. पोलीस खात्याने या बैठकीला अनुपस्थिती दर्शविली, त्यांना नाराजी कळविण्याचे आवाहन माळवदकर यांनी केले.

योगेश समेळ म्हणाले, लाल महालाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. महापौरांनी त्यासाठी बैठक लावावी, असे आवाहन केले. शिवजयंती घरोघरी साजरी करावी, अशा महत्वपूर्ण सूचना असल्याचे विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ यांनी सांगितले. उपनगरातही शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या.

महापौर म्हणाले, पुढील वर्षी डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शिवजयंतीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. महापालिकेच्या 300 शाळांत चित्रकला स्पर्धा राबवू. खाजगी शाळांनाही आवाहन करण्यात येणार आहे. शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी गणेशोत्सवाप्रमाणेच शिवजयंतीला काही स्पर्धा घेण्याची विनंती केली.

पुणे शहरात राष्ट्रपती दौरा असल्याने जिल्हाधिकारी कार्यलयात बैठक आहे. त्यामुळे आजच्या बैठकीला पोलीस अधिकारी येऊ शकले नाहीत. मात्र, शिवजयंती मिरवणूक संदर्भात पोलीस आयुक्तांशी आपण स्वतः आणि महापालिका आयुक्त बोलणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. लाल महालाचे काम दीड ते 2 महिने चालणार आहे. शिवसृष्टी कोणत्याही परिस्थितीत करणारच आहे. जे जे काही करायचे, ते करतोय.

जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसृष्टीच्या जागे संदर्भात चर्चा झाली. बीडीपीच्या जागेत शिवसृष्टी करण्यात येणार आहे. त्याच्या जागा मोजणीसाठी 2 वेळा लोक गेले. काही स्थानिकांचा विरोध आहे. नक्की काय नियमावली करायची, त्याची राज्य शासन, महापालिका ठरविणार असल्याचे महापौर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.