Chakan News : दिवंगत माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांना अपेक्षित असलेली विकासकामे करू – एकनाथ शिंदे  

एमपीसी न्यूज : खेडचे दिवंगत माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांना अभिप्रेत असलेली सर्व विकासकामे पूर्ण करण्यासाठी आणि खेडच्या विकासाला चालना देण्यासाठी अधिकाधिक निधी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन  राज्याचे सार्वजनिक बांधकाम व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकण ( ता. खेड)  येथे दिले.

खेडचे दिवंगत मा.आ. सुरेशभाऊ गोरे यांच्या प्रथम पुण्या स्मरण दिनाच्या निमित्त रविवारी (दि. १०) येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात महाआरोग्य शिबीर, कोरोना योद्धे सन्मान, कीर्तन सोहळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना मंत्री शिंदे बोलत होते. पुढे बोलताना शिंदे म्हणाले, सुरेश गोरे हे खेड मधील विविध विषय समस्या घेऊन सतत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करत होते. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी येथे निर्माण झाली आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याची सर्वांची जबाबदारी आहे.

चाकण आणि राजगुरुनगर पालिकेच्या विकास आराखड्याच्या (डीपी) बाबत तातडीने काही निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. गोरे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या लोकाभिमुख विकासाचा मंत्री शिंदे यांनी यावेळी गौरव केला.

याप्रसंगी माजी मंत्री व सेनेचे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन आहिर,  माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आ. शरद सोनवणे, जिल्हा प्रमुख माऊली कटके, सुलभा उबाळे, इरफान सय्यद, अशोक खांडेभराड, रामदास धनवटे, शिवाजी वर्पे, विजया शिंदे, महेश शेवकरी, विजयसिंह शिंदे, प्रकाश वाडेकर, सुरेश भोर, आदींसह नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, विविध गावचे सरपंच, उपसरपंच आदींसह शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते. प्रास्ताविक स्व.आ. गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे यांनी करताना येथील विकासकामांसाठी निधी , चाकण पालिकेची अन्यायकारक करवाढ रद्द करण्याची व अत्याधुनिक रुग्णवाहिका मिळावी अशी मागणी केली.

दरम्यान कार्यक्रमाच्या सकाळच्या पहिल्या सत्रात सुरुवातीला प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने नेत्रतपासणी, दंततपासणी, हृदयविकार, कान , नाक , घसा, मधुमेह, रक्तदाब, हाडांची ठिसूळता, रक्त तपासणी अशा विविध आजारांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व आरोग्य शिबिरांचा औचारिक शुभारंभ मा.आमदार जगन्नाथ शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी देवेंद्र बुट्टेपाटील, हिरामण सातकर, नानासाहेब टाकळकर, अनिल ( बाबा ) राक्षे, आदींसह सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित होते. सर्व कार्यक्रमांची सुरुवात स्व.आ. गोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी कोरोना काळात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.

अन्यायकारक करवाढ मागे घेऊ : मंत्री शिंदे 
प्रास्ताविक करताना नितीन गोरे यांच्या कडून करण्यात आलेल्या मागणीचा धागा पकडत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकण पालिकेने अन्यायकारक करवाढ केली असल्यास ती तत्काळ रद्द करण्याचे आदेश आपण चाकण पालिकेच्या मुख्याधिकार्यांना देऊ असे आश्वासन  यांनी दिले.

त्याच प्रमाणे चाकण व राजगुरुनगर पालिकेच्या डीपी बाबतचे निर्णय आणि येथील सर्व विकासकामांसाठी राज्य शासनाकडून निधी देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान मंत्री शिंदे बोलत असताना समोर बसलेल्या जनतेतून खेड पंचायत समितीच्या मुद्दाम अडवलेल्या इमारतीच्या बांधकामा बाबत आश्वासन द्या अशी मागणी करण्यात आली. त्यावर मंत्री शिंदे यांनी तातडीने या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.