Pimpri News : गणवेश परिधान करा, अन्यथा कारवाई; मुख्य सुरक्षा अधिका-याला तंबी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका सुरक्षा विभागातील प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याला गणवेश परिधान करणे बंधनकारक असताना महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पद असलेले मुख्य सुरक्षा अधिकारीच महापालिका नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याने गणवेश परिधान करून शिस्त आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिले आहेत. टाळाटाळ केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

महापालिकेत मुख्य सुरक्षा अधिकारी या जबाबदारीच्या पदावर उदय जरांडे हे कार्यरत आहेत. सुरक्षा विभागावर महापालिकेच्या संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सुरक्षा विभागातील प्रत्येक अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने त्यांना देय असलेला गणवेश परिधान करून शिस्तीचे आणि नियमांचे पालन करणे, हे त्यांचे कर्तव्य आहे. असे असताना महापालिकेकडून देण्यात आलेला गणवेश मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे हेच परिधान करत नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडून आल्या होत्या. त्यामुळे 8 सप्टेंबर 21 रोजी जरांडे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला होता.

राज्याच्या नगरविकास विभागाने 30 ऑगस्ट 2019 रोजी महापालिकेसाठी मंजूर केलेल्या आकृतिबंधात ‘मुख्य सुरक्षा अधिकारी’ हे पद नव्याने निर्माण करण्यात आले आहे. जरांडे यांनी त्यांना बजावलेल्या नोटिसीवर 9 सप्टेंबर 2021 रोजी खुलासा सादर केला. त्यामध्ये मुख्य सुरक्षा अधिकारी या पदास कोणत्याही प्रकारचा गणवेश लागू नसल्याचा खुलासा सादर केला आहे.

सद्यस्थितीत या पदाकरिता गणवेशाचे नव्याने विनिमय करण्याची कार्यवाही प्रशासन विभागामार्फत सुरू असल्याने ही कार्यवाही पूर्ण होईपर्यंत जरांडे यांनी ‘सुरक्षा अधिकारी’ या पदास असणारा गणवेश परिधान करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने अधिकाऱ्याच्या गणवेशात बदल होईपर्यंत मुख्य सुरक्षा अधिकारी जरांडे यांनी सद्यस्थितीतील गणवेश परिधान करून शिस्तीचे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. यामध्ये काही टाळाटाळ केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.