Weather Update : पुण्यासह राज्याच्या काही भागांमध्ये 48 तासात पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज : पुणे शहर परिसरात गेल्या पाच दिवसांपासून तापमानात  सातत्याने वाढ होत आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे हवामान विभागाने  पुढील दोन दिवस शहर परिसरात पावसाची शक्यता  वर्तवली आहे. वातावरणात बदल होऊन 12 नोव्हेंबरपासून थंडी गायब झाली असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पुणेकरांनी आणि खासकरून शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.  

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात दक्षिण-पश्चिम पूर्व भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे तापमानात वारंवार वाढ होत आहे. यामुळे पुढील 48 तासांत याचं रुपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्टयात होणार आहे. त्यानंतर म्हणजेच 21 नोव्हेंबरच्या सुमारास हा पट्टा ओमानच्या दिशेने पुढे सरकेल.

या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. याबरोबरच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या द्रोणीय स्थितीच्या प्रभावामुळे राज्यातील तापमनात वाढ झाली असून थंडीचा कडाका कमी झाले. त्यामुळे रोज अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये अजूनही नागरिकांनी गर्मीचा सामना करावा लागतो.

दरम्यान, पुण्यासह, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे या शहरांमध्येही थंडी गायब झाली असून ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. पुढील दोन दिवस शहर परिसरात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. तर यावेळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी. वेळीच तो कोरड्या जागी नेऊन ठेवावा अशा सूचना हवामान खात्याकडून करण्यात आल्या आहे. राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे तर दुसरीकडे दिवाळीचा उत्साह आहे. अशात पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनाही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.