Pimpri News : विवाहपत्रिका, फ्लेक्सची जागा घेतली सोशल मीडियाने, छपाई व्यवसायाचा बेरंग

एमपीसी न्यूज – कोरोना प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या निर्बंधाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असतानाच, लग्न सोहळे मर्यादित व-हाडींच्या उपस्थितीत करण्याच्या निर्बंधामुळे यंदा लग्नपत्रिका छपाईत घट झाली आहे. यापूर्वी तीनशे ते एक हजाराहून अधिक लग्नपत्रिका छपाईची ऑर्डर दिली जात होती. मात्र, आता केवळ 50 ते 60 पत्रिका छपाईची ऑर्डर दिली जात आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी राज्य शासनाने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. लग्न सोहळ्यावर विविध व्यवसाय अवलंबून असून सध्या लग्न सोहळे साध्या पद्धतीने होत आहेत. केवळ 50 जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळा करण्यास स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेकांनी लग्न सोहळे रद्द करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.

टाळेबंदीपूर्वी एका लग्न सोहळ्यासाठी तीनशे ते एक हजाराहून अधिक लग्नपत्रिका छपाई करण्याची ऑर्डर दिली जात होती. मात्र, लग्नाला उपस्थित राहणा-या व-हाडींच्या संख्येवर मर्यादा आल्याने अनेक जण समाजमाध्यमांवरून ठराविक व-हाडींना लग्नाचे निमंत्रण देतात. त्यामुळे पत्रिकांची छपाई केली जात नाही. त्यामुळे छपाई व्यवसाय अडचणीत सापडला आहे. कागदावर रंगीबेरंगी कलाकृती तयार करून छपाई करणारा व्यवसाय लॉकडाउनमुळे बेरंग झाला आहे. कोरोनामुळे या व्यवसायातील रंगच हरपल्याचे चित्र आहे.

पिंपरीतील अक्षरा प्रिटींगचे गोबन नायर म्हणाले, ”लॉकडाऊनपूर्वी एक हजाराहून अधिक लग्नपत्रिका छपाईची ऑर्डर दिली जात होती.  त्यामुळे 25 ते 30 हजार रुपयांचा व्यावसाय होत होता. आता एक ते पाच पत्रिकांची छपाई करुन घेतली जात आहे. त्यातून केवळ 100 रुपये मिळत आहेत. म्हणजे 100 टक्के नुकसान आहे. शाळा, खासगी ट्यूशन क्लासेस, मंदिर, हॉटेल बंद आहेत. पत्रक, बॅनर्स छापत होते. पण ते ही बंद आहे.  दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. शाळा चालू असताना प्रश्न, उत्तरपत्रिका छपाईचे मोठे काम मिळत होते. आता छोटेही काम मिळत नाही.

गुंतवणूक करुन करोडे रुपयांच्या मशिन खरेदी केल्या आहेत. पण, काम नाही. दिवसाला किमान 1 हजार रुपयांचे तरी काम होणे आवश्यक आहे. त्यात सरकारचे निर्बंध, दुकाने उघडण्याची परवानगी देत नाही. प्रिटींग व्यावसायाचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळ्यात सात ते आठ कोटी  रुपयांचा व्यावसाय बुडाला आहे. छपाई व्यवसाय अडचणीत सापडला आहे. अनेकांनी दुकान बंद केले आहेत. सरकारकडून छपाई व्यावसायालाही थोडीही आर्थिक मदत केली नाही. आम्ही दुकाने भाडे, कामगारांचा पगार कसा करायचा असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असेही त्यांनी सांगितले”.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.