Talegaon : वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई शुक्रवारीच का

ग्राहकांचा महावितरणला सवाल 

एमपीसी  न्यूज – दोन महिन्याचे वीजबिल थकल्यामुळे महावितरणने वीज तोडली. वीज पुरवठा बंद करताना महावितरणने कोणतेही कारण लक्षात घेतले जात नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये महावितरण विषयी संताप वाढत आहे.  महावितरणकडून आठवडाभरात केवळ शुक्रवारी वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई येत आहे. पुढील दोन दिवस सुटीचे असल्याने वीजबिल भरता येत नाही.  त्यामुळे वीजग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोप तळेगाव दाभाडे येथील वीज ग्राहक जयश्री कुलकर्णी यांनी केला आहे.

जयश्री कुलकर्णी म्हणाल्या, घरगुती आणि वैयक्तिक कारणांमुळे माझ्याकडून मागील दोन महिन्यांचे वीजबिल भरायचे राहिले. त्यामुळे महावितरणच्या कर्मचा-यांनी आज (शुक्रवारी) माझ्या घरातील वीजपुरवठा खंडित केला. ग्राहकांना त्रास देण्यासाठी महावितरणकडून मुद्दाम शुक्रवारी वीज तोडली जात आहे. ज्यामुळे शनिवार, रविवार हे दोन दिवस सुट्टी असल्याने ग्राहकांना बिल भरण्यास जमत नाही. शनिवार, रविवार जरी बिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे आदेश महावितरणकडून देण्यात आले असले तरी तळेगावमधील वीजबिल भरणा केंद्र शनिवारी बंदच असते. वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई शुक्रवारीच का असा सवाल तळेगाव दाभाडे येथील वीजग्राहक करीत आहे.

सध्या मुलांच्या परीक्षा सुरु आहेत. एका आठवड्यावर दिवाळी आली आहे. घरात कामाची गडबड सुरु असतानाच नेमकी कारवाई केली जात आहे. नागरिकांना काही वेळेला अति महत्वाच्या कामामुळे, तर कधी आजारी असल्यामुळे अनेकदा वीजबिल भारण्यासोबतच अनेक कामे राहून जातात.  लाखोंची वीजबिल थकीत आहे. त्यांच्यावर वीजबिल तोडण्याची कारवाई का होत नाही. सर्वसामान्य जनतेला का वेठीस धरले जाते. पण या अडचणी समजून न घेता महावितरण कारवाईचा बडगा उचलत असल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून सामान्य जनतेलाच नेहमी वेठीस धरले जाते. आधीच महागाईने जनता बेजार झाली असून त्यात हा महावितरणचा असा डोक्याला ताप होत आहे. महावितरणने याबाबत लक्ष घालायला हवे, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.