Technology News : WhatsApp ने घेतली माघार !,  प्रायव्हसी अपडेट प्लॅन पुढे ढकला

 एमपीसी न्यूज : WhatsApp ने आपला प्रायव्हसी अपडेट प्लॅन पुढे ढकलण्याचा निर्णय घेत युझर्सना मोठा दिलासा दिला आहे. टीका आणि संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅपने एक पाऊल मागे घेत हा निर्णय घेतला. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप युझर्सना नवीन धोरणं वाचून अटी मान्य करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. 8 फेब्रुवारीला कोणतंही अकाऊण्ट डिलीट होणार नाही, अशी ग्वाही व्हॉट्सअ‍ॅपने दिली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून WhatsApp च्या नवीन गोपनीयता धोरणाबाबत अनेक बातम्या प्रसिद्ध होत आहेत. ‘WhatsApp च्या नवीन गोपनीयता धोरणात फेसबुक आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त आहे. आता आधीच्या तुलनेत युझर्सचा अधिक डेटा फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर केला जाईल’ असं व्हॉट्सअ‍ॅपने सांगितलं होतं. यातून गोंधळ उडाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

युझर्सना धोरणं समजण्यासाठी अधिक वेळ

8 फेब्रुवारीला कोणाचंही व्हॉट्सअ‍ॅप अकाऊण्ट डिलीट केलं जाणार नाही. गोपनीयता आणि सुरक्षेबाबत पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 15 मे रोजी नवे बिझनेस ऑप्शन्स खुले होण्याआधी युझर्सना आमची धोरणं समजून देण्यासाठी अवकाश देत आहोत, असं व्हॉट्सअ‍ॅपने पुन्हा स्पष्ट केलं.

 

व्हॉट्सअ‍ॅपचे स्पष्टीकरण

‘तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मित्रांसह कुटुंबाशी गप्पा मारता, तुमचं हे चॅटिंग पूर्णपणे सुरक्षित आहे. तुमच्या गोपनीयतेला (प्रायव्हसीला) कोणताही धोका नाही’ असं व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या नवीन निवेदनात स्पष्ट केलं होतं. ‘कंपनी तुमच्या खासगी संदेशांचे संरक्षण करते. कंपनी तुमचे कॉल्स ऐकत नाही किंवा फेसबुकसोबत शेअर करत नाही. तुमच्या गप्पा, ग्रुप्स आणि कॉल्स एंड टू एंड एनक्रिप्टेड आहेत. आम्ही कोणत्याही युझरचे लॉग्स (कॉल लॉग्स, चॅट डिटेल्स) सेव्ह करत नाही. तुम्ही कधी आणि कोणाशी बोलत आहात, याबाबतची माहिती आमच्याकडे साठवून ठेवली जात नाही.’ असंही व्हॉट्सअ‍ॅपने स्पष्ट केलं होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.