Pimpri: ‘कोरोना’मुळे व्हॉट्सअॅप ग्रुपही झाले ‘ओन्ली अॅडमीन कॅन सेंड मेसेज’!

मेसेजचा भडीमार, अफवांचे पीक, त्यात पोलिसांचा ससेमिरा

एमपीसी न्यूज – सध्या जगभरात कोरोनाने हाहाकार माजविला असून हजारो नागरिकांचे बळी जात आहेत. सर्वत्र कोरोना,…कोरोना आणि कोरोनाचीच चर्चा सुरु आहे. ‘लॉकडाऊन’मुळे नागरिक घरी असल्याने सोशलमिडीयाचा वापर वाढला असून नागरिक अधिक ‘अॅक्टीव्ह’ झाले आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेजचा होणारा भडीमार,  खातरजमा न करता फॉरवर्ड केलेल्या मेसेजमुळे काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे धास्तावलेल्या अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमीनने ‘ओन्ली अॅडमीन कॅन सेंड मेसेज’ अशी सेटिंग केली आहे.

जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाना भारतात देखील मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. भारतात एक हजाराच्यावर बाधितांचा आकडा गेला आहे. महाराष्ट्रसह पिंपरी-चिंचवड शहरात देखील कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केंद्र सरकारने 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊन केले आहे. तसेच  संचारबंदी देखील  लागू आहे. यामुळे नागरिक घरात बसून आहेत.

नागरिक घरी असल्याने सोशलमिडीयाचा देखील वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच अनेकांना वर्क फ्रॉम होमची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे नेटचा वापर वाढला असून दररोज दीड ते दोन जीबीचे नेट पॅकही कमी पडत आहे.  फावल्या वेळेत फेसबुक, व्हॉट्सअॅपचा वापर वाढला आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपवर कोरोनासंदर्भातील मेसेजचा भडीमार होत आहे. वृत्तवाहिन्या, घरोघरी सर्वेत्र कोरोना, कोरोना आणि कोरोनाचीच चर्चा सुरु आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकची भीती निर्माण होत आहे.

कोरोनासंदर्भात सोशलमिडीयावर पिंपरी महापालिका आयुक्तांच्या नावाने खोटा मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी एकावर गुन्हाही दाखल केला आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेजचा होणारा भडीमार,  खातरजमा न करता फॉरवर्ड केलेल्या मेसेजमुळे काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे धास्तावलेल्या आणि कोरोनासंदर्भातील मेसेजला वैतागलेल्या अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनने सेटिंग बदलत ‘ओन्ली अॅडमिन कॅन सेंड मेसेज’ अशी सेटिंग केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.