_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Hinjawadi : पती वाहतूक कोंडीत अडकू नये म्हणून काढलेला फोटो व्हायरल होतो तेंव्हा…

एमपीसी न्यूज – एका आयटी अभियंता पत्नीने आपल्या आयटी अभियंता पतीला हिंजवडीच्या वाहतूक कोंडीत अडकायला लागू नये, यासाठी काढलेला फोटो व्हायरल झाला. व्हायरल झालेला फोटो अनेक माध्यमांनी वापरला, त्या फोटोचे कौतुक देखील केले. सुरुवातीला हा फोटो एखाद्या व्यावसायिक फोटोग्राफरने काढलेला असेल म्हणून सोडून दिलेला विषय हा फोटो एका आयटी अभियंता महिलेने काढल्याचे समजताच सर्वांच्याच भुवया ताणल्या गेल्या. मागील दोन दिवसांपासून चर्चेत असलेल्या फोटोच्या निर्मात्या महिलेशी ‘एमपीसी न्यूज’ने चर्चा केली. या महिलेने फोटोच्या कल्पनेसह त्यांच्या सोसायटी आणि परिसरातील हजारो नागरिकांना होणारा रोजचा त्रास देखील व्यक्त केला आहे.

जगातील अनेक प्रसिद्ध झालेले फोटो व्यावसायिक छायाचित्रकारांनी न काढता सर्वसामान्य लोकांनी काढलेले आहेत. ज्यांना फोटोग्राफीचे व्यावसायिक ज्ञान नाही, ज्यांच्याकडे फोटोग्राफीतला कलरसेन्स आणि अँगल नाही, असे लोक सुद्धा अतिशय उत्तम आणि वास्तववादी फोटो काढू शकतात. हे नुकतेच एका फोटोवरून समोर आले आहे. खरं तर वास्तव मांडण्यासाठी प्रोफेशनल असण्याची अजिबात गरज नाही. जे जसं आहे, ते तसं मांडायला, जे वाटतंय ते व्यक्त करायला, जे भावलंय ते सांगायला प्रोफेशनल असण्याची आणि अन्य प्रगल्भतेची गरजच नाही. प्रज्ञा चांदवडकर-सावळे यांनी देखील त्यांना रोज होणारा वाहतूक कोंडीचा त्रास केवळ त्यांच्या घराच्या खिडकीतून टिपला आणि तो माहितीसाठी आपल्या पतीला पाठवला. त्यातून हिंजवडी मधील वाहतूक कोंडीची भीषणता, वास्तवता आणि त्याचा नागरिकांना होणारा त्रास यानिमित्ताने समोर आला आहे.

प्रज्ञा भूमकर चौकातील वाय जंक्शन येथे असलेल्या रॉयल ग्लोरी या सोसायटीमध्ये राहतात. त्या शिवाजीनगर येथील एका आयटी कंपनीत तर त्यांचे पती विश्वास सावळे हिंजवडी मधील एका आयटी कंपनीत नोकरी करतात. सकाळी 8 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 11 या कालावधीत हिंजवडी आणि परिसरात वाहतूक कोंडी असतेच असते. कंपनीत जाण्यासाठी त्यांना साधारणतः अर्धा तास लागतो. पण या वाहतूक कोंडीमुळे त्यांना वेळेच्या आधी दोन ते अडीच तास घराच्या बाहेर पडावं लागतं. प्रज्ञा सांगतात की, रॉयल ग्लोरी आणि त्याच्या बाजूला आणखी दोन ते तीन सोसायटी आहेत. ज्यामध्ये एकूण दोन हजार पेक्षा अधिक लोक राहतात. या सर्व सोसायटी मधील बहुतांश लोक आयटी क्षेत्रात काम करतात. सर्वांनाच वेळेपूर्वी दोन ते अडीच तास अगोदर घराबाहेर पडावं लागतं. यामुळे घरच्यांना देण्यासाठी वेळच राहत नाही.

प्रज्ञा यांना रोज सकाळ-संध्याकाळ एखाद दुस-या रुग्णवाहिकेचा आवाज येतोच. जवळच काही खाजगी मोठी रुग्णालये असल्याने रुग्णवाहिका सहसा या मार्गावर धावतात. रुग्णवाहिकेचा आवाज आला की, प्रज्ञा खिडकीतून बघतात. रुग्णवाहिकेचा आवाज ऐकून न ऐकल्यासारखं करणारे वाहन चालक त्यांना रोज दिसतात. एखाद्या वेळी काही जणांनी ठरवून रुग्णवाहिकेला वाट मोकळी करू दिलीच, तर मोकळ्या झालेल्या रस्त्यावरून आपलीच गाडी वेगात नेणारे काही अतरंगी चालकही त्यांच्या नजरेस पडतात. रुग्णवाहिकेचा आवाज ऐकल्यानंतर आपली गाडी बाजूला घेऊन रुग्णवाहिकेला वाट करून द्यावी, एवढी साधी गोष्ट सुद्धा या गर्दीला करावीशी वाटत नाही. कदाचित रुग्णवाहिकेत मृत्यूशी झुंजणा-या व्यक्तीऐवढीच आपली सुद्धा झुंज सुरु असल्याचे त्यांना वाटत असेल. बहुतांश लोक भावनाशून्य झाले आहेत. काही जणांकडे भावना आहेत. पण एवढ्या अजस्त्र गर्दीत ते काहीच करू शकत नाहीत, असेही त्या नमूद करतात.

_MPC_DIR_MPU_II

माजी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी मागील वर्षी हिंजवडी मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठोस उपाय योजना केल्या. शिवाजी चौक, वाकड ब्रिज, फेज एक, फेज दोन, फेज तीन, परिसरातील अनेक रस्त्यांसह भूमकर चौकातील वाहतुकीत देखील त्यांनी बदल केले. भूमकर चौकातील वाय जंक्शनवर एकेरी वाहतूक करण्यात आली. हिंजवडीला वाहतूक कोंडीतून सोडविण्यासाठी या उपाययोजना चांगल्या आहेत. पण याचा रस्त्याच्या बाजूला असलेल्या सोसायट्यांना मात्र खूप त्रास होतो, असे प्रज्ञा सांगतात. भूमकर चौकातून वाय जंक्शन वरून एक रस्ता फेज एककडे जातो. तर दुसरा रस्ता मारुंजीकडे जातो. या मार्गावरून फेज एक, फेज दोन, फेज तीन हे आयटी पार्क जवळ आहेत. तसेच हा हिंजवडीकडे जाणारा पिंपरी-चिंचवडकरांसाठी मुख्य मार्ग असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहने धावतात. इथून रॉयल ग्लोरी आणि या भागातील सोसायट्यांकडे वळण्यासाठी मार्ग नाही. त्यामुळे हिंजवडीकडून येणा-या वाहनांना पार काळा खडक येथून परत वळून यावे लागते. घराच्या बाजूने आपण जातो, पण घरात जाऊ शकत नाही. घरात जाण्यासाठी काही किलोमीटर अंतर पार करून घरात जावे लागते. यामुळे अडचण होते.

भूमकर चौकाजवळ मुख्य मार्गाला एक सेवा रस्ता आहे. अनेक दुचाकीस्वार या मार्गावरून भरधाव वेगात जातात. अनेक वेळेला फूटपाथ वरून देखील हे दुचाकीस्वार आपली दुचाकी हाकतात. वाय जंक्शनच्या परिसरात राहणा-या लोकांना रस्ता ओलांडण्यासाठी सुद्धा अर्धा ते एक तास लागतो. त्यात सेवा रस्त्यावरून होणारी भरधाव वाहतूक जीवघेणी ठरते. याबाबत रॉयल ग्लोरी सोसायटीने महापालिकेकडे वाय जंक्शन येथील आयकॉन लिनेअरा, ऑलंपिया आणि रॉयल ग्लोरी सोसायटीसाठी स्वतंत्र बंदिस्त रस्ता करून देण्याची मागणी केली आहे. पण त्यांच्या मागणीकडे अजूनपर्यंत कोणी लक्ष दिलेले नाही.

शनिवार (दि. 21) पासून पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. अनेक रस्त्यांवर पाणी साचले. नाले पुन्हा एकदा तुडुंब भरले आणि नेहमीची होणारी वाहतूक कोंडी आणखी भीषण झाली. दोन दिवस संततधार पडणा-या पावसाने मंगळवारी (दि. 24) जास्तच वाहतूक कोंडी झाली. हिंजवडी फेज एक येथून निघालेला व्यक्ती तीन तासानंतर हिंजवडीच्या बाहेर पडू लागला. वाय जंक्शन पुन्हा जॅम झाले. प्रज्ञा मंगळवारी लवकर घरी आल्या. रात्री आठच्या सुमारास त्यांना त्यांच्या खिडकीतून वाहतूक कोंडीचा नजारा दिसला. पती विश्वास यांना याची माहिती द्यावी, म्हणून त्यांनी घराच्या खिडकीतून त्यांच्या मोबाईलमध्ये एक फोटो काढला. हा फोटो त्यांनी सोसायटीच्या ग्रुपमध्ये आणि विश्वास यांना पाठवला. वाय जंक्शन येथे सध्या काय परिस्थिती आहे, अशी माहिती त्यांना त्या फोटोमधून विश्वास यांना द्यायची होती.

प्रज्ञा यांनी काढलेला फोटो क्षणात शहरात व्हायरल झाला. हिंजवडी वाहतूक विभाग, पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती मिळाली. वाय जंक्शन आणि परिसरात आणखी पोलीस पाठवून वाहतूक कोंडी सोडविण्याच्या पोलिसांच्या हालचाली सुरु झाल्या. रात्री उशिरापर्यंत सर्व पोलीस वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर थांबले. शहरातील माध्यमांमध्ये या फोटोची चर्चा सुरु झाली. हिंजवडीची वाहतूक कोंडी ख-या अर्थाने या फोटोमध्ये दिसत असल्याने हा फोटो एखाद्या व्यावसायिक फोटोग्राफरने काढला असेल, असे समजून सर्वांनी काही वेळेत चर्चा थांबवली. पण हा फोटो व्यावसायिक फोटोग्राफरने काढला नसून एका सर्वसामान्य महिलेने काढला असल्याचे समजताच सर्वांनी भुवया उंचावल्या. कारण, माध्यमांना आणि नागरिकांना हिंजवडीच्या वाहतूक कोंडीचा खरा अँगल सापडला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.