Pimpri: दापोडी-निगडी बीआरटी मार्गावर ठिकठिकाणी खोदाई; बस धावणार कशी ?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी हा बहुचर्चित बीआरटीएस मार्ग सुरु करण्यास नुकतीच न्यायालयाने परवानगी दिली. तथापि, या बीआरटी मार्गावर ठिकठिकाणी खोदाई सुरु आहे. त्यामुळे या मार्गावर प्रत्यक्षात बीआरटी बस धावणार कधी सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच खोदाईमुळे वाहतुकीवर देखील परिणाम होत आहे. काळभोरनगर ते खराळवाडीपर्यंत वाहतूक संथ गतीने सुरु असते.

नागरिकांना विनाअडथळा जलद प्रवास करता यावा, प्रदूषणमुक्तीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, यासाठी ‘बस रॅपिड ट्रान्झीट सिस्टम’ अर्थात बीआरटीएस मार्ग उभारण्यात आले आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून मुंबई-पुणे मार्गावरील निगडी ते दापोडी या साडेचौदा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू करण्याचा प्रकल्प रेंगाळला होता. या मार्गावरील सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली असून बीआरटीएस सुरु करण्यास न्यायालयाने हिरवा कंदील दर्शविला आहे. त्यानंतर प्रशासनाने येत्या आठ ते दहा दिवसात बीआरटी सुरु करणार असल्याचे सांगितले.

परंतु, या मार्गावर ठिकठिकाणी पुणे महामेट्रोकडून खोदाई सुरु आहे. निगडीकडून दापोडीकडे जाण्याच्या मार्गावर काळभोरनगर, महापालिका मुख्यालयासमोर आणि पिंपरी चौकाच्या पुढे मोठ्या प्रमाणात खोदाई केली आहे. तसेच बीआरटीएसची उर्वरित कामे देखील करण्यात येणार आहेत. त्यामुळे बीआरटी बस धावण्याची आणखीन सुमारे दीड ते दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. याशिवाय खोदाईची कामे सुरु असल्यामुळे वाहतुकीवर देखील परिणाम होत आहे. काळभोरनगर ते खराळवाडीपर्यंत वाहतूक संथ गतीने सुरु असते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.