Pune : सूत्रधारांना कधी पकडणार ? महाराष्ट्र अंनिसचा शासनाला सवाल

एमपीसी न्यूज – डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या निर्घृण खुनाला येत्या २० ऑगस्टला सहा वर्षे पूर्ण होत आहेत. उच्च न्यायालयाने अनेक वेळा फटकारल्या नंतर गेल्या वर्षी सीबीआयने सचिन अन्दुरे आणि शरद कळसकर या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या मारेकर्‍यांना अटक केली होती. त्यानंतर अनेक वर्षे लांबलेल्या या प्रकरणातील तपास जलदगतीने पूर्णत्वाला जाईल आणि या खुनाच्या मागील सूत्रधारांना अटक केली जाईल अशी अपेक्षा होती. पण तपास हा अतिशय संथ गतीने सुरु असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी पकडले. सूत्रधार कधी पकडणार ? असा सवाल महाराष्ट्र अनिस मार्फत आज पुणे येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तपास यंत्रणांना विचारण्यात आला.

यावेळी अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख ,पुणे जिल्हा कार्यध्यक्ष नंदिनी जाधव ,पुणे शहर अध्यक्ष श्रीपाल ललवाणी, दीपक गिरमे आणि  हमीद दाभोलकर उपस्थित होते.

डाॅ. हमीद दाभोळकर यावेळी  म्हणाले की, डॉ नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनाच्या तपासातून आणि आजपर्यंत दाखल झालेल्या आरोपपत्रांमध्ये हे चारही खून एका सामाईक उद्दिष्टाने आणि एकाच विशिष्ट कट्टरपंथीय संघटनेच्या लोकांकडून झाल्याचे पुढे आले आहे. असे असताना देखील शासन या संघटनेच्या विषयी ठोस कारवाई करताना दिसत नाही. हे निषेधार्ह आहे. डॉक्टर दाभोळकरांच्या मारेकर्‍यांचे त्यांच्याशी कोणतेही वैयक्तिक वैर नव्हते. केवळ त्यांच्या विचारांना विरोध करण्यासाठी भडकावले गेल्याने हा खून करण्यात आल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे, अशा पार्श्वभूमीवर मारेकऱ्यांच्या इतकेच त्यांची डोकी नियोजनबद्ध पद्धतीने भडकवणारे सूत्रधार देखील जबादार आहेत. जोपर्यंत हे सूत्रधार मोकाट आहेत. तोपर्यंत विवेकवादी लोकांना असलेला धोका कायम आहे. त्यामुळे आणखी वेळ न दवडता या सूत्रधारांवरती कारवाई करण्यात यावी.

डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणात अटक झालेल्या अमोल काळे, अमित दिगवेकर, राजेश बंगेरा या तिघांवर सीबीआयने वेळेत आरोपपत्र दाखल केले नसल्याने त्यांना जामीन मंजूर झालेला आहे. इतर गुन्ह्यात अटक असल्याने जरी अजून त्यांची सुटका झाली नसली तरी चारही विवेकवाद्यांच्या खुनात सहभागी असलेल्या लोकांवर आरोपपत्र दाखल करण्यात सीबीआय अक्षम्य दिरंगाई करीत असल्याची खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

_MPC_DIR_MPU_II

डॉ. दाभोळकर यांच्या खुनासाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलांचे भाग मुंबई जवळच्या खाडीतून शोधून काढण्यासाठीच्या परवानग्या मिळण्यासाठी उच्च न्यायलयाने वेळोवेळी नाराजी दाखवून देखील जवळजवळ सहा महिन्यापेक्षा अधिक काळ परवानगी मिळू शकत नाही. याकडे देखील त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

तपासात शासनाकडून होत असलेली दिरंगाई चालूच असली तरी डॉक्टर नरेद्र दाभोळकरांनी चालू केलेले अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम मात्र अत्यंत निर्धाराने पुढे जात आहे आणि त्याला समाजात वाढता प्रतिसाद मिळत आहे. हे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.

२० ऑगस्टला ज्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉक्टर दाभोळकरांना गोळ्या झाडण्यात आल्या. त्या ठिकाणी १९ तारखेला संध्या. सात वाजता कॅण्डल मार्चद्वारे अभिवादन केले जाणार आहे. वीस तारखेला सकाळी ९ वाजता सूत्रधार कधी पकडणार जबाब दो आंदोलन केले जाणार आहे. तर संध्याकाळी ५.३० वाजता टिळक स्मारक मंदिर येथे ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक ‘एन राम’ हे वर्तमान भारताच्या समोरची तीन आव्हाने विवेकावरील हल्ला, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधने आणि जन समुहांच्या वंचिततेचे वास्तव ह्या विषयी नरेंद्र दाभोलकर स्मृती व्याख्यान देणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या दोन्ही कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या ‘प्रश्न तुमचा आणि उत्तर दाभोळकरांचे’ आणि ‘ठरलं डोळस व्हायचं’ या दोन पुस्तकांच्या राजकमल प्रकाशनच्या मार्फत प्रसिद्ध होणाऱ्या हिंदी अनुवादांचे देखील लोकार्पण यावेळी होणार आहे. तसेच ‘विवेकाचा आवाज’ या डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या दहा भाषणांचे शब्दांकन केलेले पुस्तक साधना प्रकाशन मार्फत प्रकाशित केले जाणार आहे.

जरी अजूनही डॉ. दाभोळकरांच्या खुनाचे सूत्रधार सापडलेले नसले तरी त्याचा केवळ निषेध करण्यापुरते मर्यादित न राहता कोल्हापूर आणि सांगली भागामध्ये झालेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर दाभोळकरांची आठवण, पूरग्रस्त लोकांना मदत करून सकारात्मक पद्धतीने जागवली जाणार आहे, असे देखील यावेळी सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.