Pimpri News : स्मार्ट सिटीमधील रिक्षा मीटर प्रमाणे धावणार कधी ?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मीटर प्रमाणे रिक्षा सुरु करावी. मीटर नुसार भाडे घेण्याबाबत रिक्षा चालकांना बंधनकारक करावे, अशा मागण्या नागरिकांकडून वेळोवेळी करण्यात येत आहेत. मीटर प्रमाणे रिक्षा धावत नसल्याने मनमानी पद्धतीने भाडे आकारणे, ग्राहक आणि रिक्षा चालक यांच्यातील वादातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागणे, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहेत.

मीटर डाऊनसाठी रिक्षा चालक नकार देत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात मीटरप्रमाणे रिक्षा कधी धावणार, असा प्रश्न पिंपरी-चिंचवडकरांना पडला आहे.

चिंचवड स्टेशन पासून चिंचवड गावात जाण्यासाठी मीटर नुसार सुमारे 40 रुपये भाडे होते. मीटर प्रमाणे भाडे आकारले जात नसल्याने रिक्षा चालक मागे चार आणि पुढे दोन असे सहा प्रवासी एका वेळी घेऊन जातात. त्यात रिक्षा चालकाला 60 रुपये मिळतात. ही 20 रुपयांची हाव प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारी आहे. मीटर नुसार भाडे न घेतल्यामुळे रिक्षा चालकांना जास्त पैसे मिळतात.

तसेच काही रिक्षा चालक किलोमीटर अंतरासाठी प्रवाशांची अडवणूक करून मनमानी पद्धतीने पैसे घेतात. काही प्रवासी नाईलाजाने पैसे देतात. पण काहीजण रिक्षा चालकांना अवाजवी पैसे देण्यास नकार देतात. अशा वेळी रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यात भांडणे होतात. असे प्रकार शहरात काही ठिकाणी घडले देखील आहेत.

पावसाळ्याच्या दिवसात एक कुटुंब खरेदीसाठी बाजारात आले होते. बाजार त्यांच्या घरापासून एक किलोमीटरच्या अंतरावर होता. अचानक पाऊस सुरु झाल्याने प्रवासी आणि त्याच्या पत्नीने रिक्षाने जाणे पसंत केले. रिक्षामधून ते दाम्पत्य घरापर्यंत पोहोचले. मात्र, केवळ एका किलोमीटर अंतरासाठी 200 रुपये भाडे द्यावे, अशी मागणी रिक्षा चालकाने केली. यातून भांडण होऊन रिक्षा चालकाने प्रवाशाला मारहाण केली.

शहरात भंगारातल्या रिक्षा रंगरंगोटी करून चालवल्या जातात. यातून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो. यावर कारवाई करत पोलिसांनी मुदतबाह्य भंगार रिक्षा जप्त केल्या आहेत.

अनेक रिक्षा चालक गणवेश घालणे पसंत करीत नाहीत. वाहतूक विभागाने रिक्षा चालकांना गणवेश आणि बॅच बंधनकारक केला असला तरीही रिक्षा चालकांकडून पोलिसांच्या आदेशाला थेट केराची टोपली दाखवल्याचे शहरात पाहायला मिळते.

मागील काही वर्षात शहरात एकही नवीन अधिकृत रिक्षा थांबा तयार झालेला नाही. एखादी सोसायटी, शॉपिंग मॉल, चौक, दवाखाना अशा ठिकाणी एखादा फलक लावायचा आणि तिथे टोळीने रिक्षा घेऊन थांबायचे, असा प्रकार शहरात सर्रास सुरु आहे.

ज्या 10-12 रिक्षा चालकांनी फलक लावला आहे, त्याच रिक्षा चालकांना तिथे थांबू दिले जाते. दुस-या रिक्षा चालकांना तिथे फिरकू देखील दिले जात नाही. एखादा रिक्षा चालक आला आणि प्रवासी भरू लागला तर त्याला दमदाटी करून प्रवाशांना रिक्षातून उतरवण्यापर्यंत या रिक्षा चालकांची मजल जाते.

रिक्षा चालकांनी मीटर प्रमाणे भाडे आकारल्यास वाहतुकीला शिस्त, नागरिकांना सुलभ आणि परवडणारी प्रवाशी व्यवस्था आणखी सक्षम होईल. पण ही हे होणार कधी, असा प्रश्न आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.