Article by Harshal Alpe : हे राजकारणाच नाटक कधी थांबणार?

 

एमपीसी न्यूज (हर्षल आल्पे) : हल्ली कुठे ही गेलं की प्रत्येकच ठिकाणी राजकारण येत आणि त्यामागून आरोप-प्रत्यारोप होतात. त्यातच मनोरंजन शोधावं लागतं. या मनोरंजनाचा कधीकधी वीट येतो. आता तर चांगल्या कामांच्या उद्घाटनालाही राजकीय मंडळी एकमेकांवर टोमणे बाजी करत राहतात. मग सामान्य माणसाला असा प्रश्न पडतो की, आपलं एकूणच राजकारण इतक्या खालच्या पातळीवर का गेले?

पूर्वीच्या काळी आपले मोठे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यात एक प्रकारचा समजूतदारपणा होता, एक विचारांची खोली होती. आपण जनतेसाठी काहीतरी देणे लागतो हा विश्वास होता. आजही काही प्रमाणात तो काही नेत्यांमध्ये आहे मात्र सय्यम कुठेतरी हरवत चाललाय हि खेदाची गोष्ट वाटते.

अगदी लांबच्या काळात का जा? माननीय शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि जाणते नेते शरदचंद्रजी पवार साहेब ही दोन राजकारणातले दोन ध्रुव होते. दोघे एकमेकांवर टीका ही करत. मात्र सार्वजनिक पक्षनिहाय कार्यक्रमात दोघेही मिश्कीलपणे खेळीमेळीचे वातावरण तयार करत, कार्यक्रमाचे मांगल्य जपत.

ही महाराष्ट्राची परंपरा गेली कुठे? त्याच्या आधी आचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि खऱ्या अर्थाने लोकप्रियतेचे शिखर गाठलेले नेते. यांच्यात वाक्युद्ध रंगत असे पण अनेक उद्घाटन प्रसंगीची भाषणे आजही ध्वनीफितीद्वारे ऐकायला मिळतात तेव्हा राजकारणातील प्रगल्भता जाणवते. त्याकाळातील श्रोत्यांच्या मनात ती घर करून होती आणि आजही ज्यांना ती ऐकायला मिळाली त्यांनाही ती भिडते.

आजच्या तरुण पिढीला सुद्धा सतत भांडणेच बघायला आवडतात असे ही नाही. उलट दोन शत्रु असलेले नेते जेव्हा सार्वजनिक जीवनात आपल्या प्रगल्भतेचे प्रदर्शन करतात तेव्हा त्यातुन नव्या पिढीला ही राजकारणात येण्यासाठी प्रेरणा मिळते ती प्रेरणा आणि तो आदर्श जपला पाहिजे. नाहीतर नवीन पिढी राजकीय बाबतीत उदासीन होईल.

एखाद्या नाटकात राजकीय संदर्भ असलेला संवाद आला, संघर्ष झाला की ते नाटक बघायला श्रोत्यांना मजा येते खरी पण, राजकीय जीवनात जेव्हा सगळेच नाटक व्हायला लागते तेव्हा सगळेच किळसवाणे ठरते, एवढेच महत्त्वाचे. शेवटी विचारांची प्रगल्भता जपली पाहिजे. तर आणि तरच आदर्श राजकारण होऊन विकासाची ही क्षिप्रा वेगाने अखंड वाहु लागेल.

धन्यवाद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.