News Delhi : कुठे पसरणार मलेरियची साथ, भारतीय हवामान खाते देणार अंदाज 

एमपीसी न्यूज : पुढील मोसमी पावसाच्या काळात मलेरियाची साथ कोणत्या भागात पसरू शकते याचा अंदाज आता भारतीय हवामान खाते देणार आहे, असे पृथ्वी विज्ञान खात्याचे सचिव एम. राजीवन यांनी शनिवारी सांगितले. या अंदाजासाठी आतापर्यंत नागपूरमध्ये माहितीचा जो अभ्यास करण्यात आला, त्या प्रारूपाचा वापर केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

‘अलिकडील हवामान बदल व हवामान अंदाज’ या विषयावर भारतीय विज्ञान अकादमीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले, की भारताने हवामानविषयक अंदाजांसाठी संगणन क्षमता वाढवली असून त्यात १० पेटाफ्लॉप ते ४० पेटाफ्लॉप यंत्रणा वापरली जात आहे. त्यातून हवामान अंदाजात सुधारणा होईल.

सध्या अमेरिका, ब्रिटन, जपान यांच्यानंतर भारत हा उच्च क्षमता संगणनात आघाडीवर आहे. राष्ट्रीय मोसमी पाऊस अभियानावर ९९० कोटी रुपये खर्च करण्यात आले असून उच्च क्षमता संगणनामुळे गुंतवणुकीच्या पन्नास पट अधिक लाभ मिळाले आहेत.

ते म्हणाले की, हवामान खात्याने मलेरिया व पाऊस तसेच तापमान यांच्या संबंधांचा अभ्यास केला आहे. नागपूरहून मलेरियाबाबत मिळालेल्या माहितीचा अभ्यास केला असून आता तीच पद्धत इतरत्र वापरली जाणार आहे. मलेरियाचा उद्रेक कुठल्या ठिकाणी होऊ शकतो याचा अंदाज येत्या पावसाळ्यापासून वर्तविला जाईल. डेंग्यू, कॉलराबाबतही हीच पद्धत वापरता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.