दहावीनंतर पुढे काय ?

एमपीसी न्यूज- जूनच्या पहिल्या आठवड्यात इयत्ता दहावीचे निकाल जाहीर होतील. निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता असते ती करियर निवडीची. कोणते करियर निवडावे याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमावस्था असते. कारण योग्य करियरची निवड ही विद्यार्थ्याला यशाच्या मार्गावर नेते तर चुकीचे करियर निवडल्यास विद्यार्थ्यांमध्ये निराशा निर्माण होते. शिवाय आयुष्यातील महत्वाची वर्षे वाया जातात. म्हणूनच एमपीसी न्यूज घेऊन येत आहे करियर निवडीवर मार्गदर्शन करणारी मालिका ‘दहावीनंतर पुढे काय ?’ यामध्ये मानसशास्त्रतज्ञ, करिअर मार्गदर्शक व समुपदेशक डॉ. समिता प्रशांत चव्हाण या मार्गदर्शन करणार आहेत.

दहावीनंतर पुढे काय करायचे….?

शंभरातील ऐंशी जणांना आपण दहावीनंतर शिक्षणाची कोणती शाखा निवडावी हे नेमके ठरविता येत नाही. जे ठरवितो ते वस्तुनिष्ठ आहे, का प्रवाहाच्या दबावामुळे आहे हे कळत नाही, कारण मुळात आपला समाज हा पारंपारिकतेवर जास्त विश्वास ठेवणारा आहे. दहावीनंतर शाखा निवडण्यात अनेक विद्यार्थ्यांची चूक होते. त्यामुळे ते पुन्हा अकरावी नंतर शाखा बदलतात, असे बऱ्याच वेळा दिसून आले आहे. अकरावी सायन्स घेतलेले विद्यार्थी विज्ञान व गणित झेपत नाही त्यामुळे ते शाखा बदलण्याचा प्रयत्न करतात. काहींना गणित झेपत नाही म्हणून बारावीला गणित ऐवजी भूगोल विषय घेतात. कॉमर्सचे विद्यार्थी अकॉउंटन्सी व गणिताला कंटाळून कला शाखा घेतात. हा गोंधळ टाळण्यासाठी करिअर मार्गदर्शक व समुपदेशकाला अगोदरच मनमोकळेपणाने विद्यार्थी व पालकांनी आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे. त्यासाठी आपल्या मुलांनाही बोलू द्यावे.

दहावी नंतर पुढे काय करायचे याचा निर्णय विद्यार्थ्यानी व पालकांनी चर्चा करून विचारपूर्वक घ्यायला हवा. पालक व पाल्य मध्ये कोणत्या क्षेत्रात करिअर करावे यावर एकमत होत नसेल तर घाईने, वादविवादाने, रागाने, किंवा जबरदस्तीने निर्णय न घेता, अनुभवी करिअर मार्गदर्शक व समुपदेशकाचा सल्ला अवश्य घ्यावा. ज्यामुळे पाल्याच्या आयुष्याला योग्य दिशा मिळण्यास मदत होईल व तो करिअर मध्ये यशस्वी वाटचाल करेल.

दहावीच्या गुणांवर करिअर निवडीचा निर्णय घेऊ नका. दहावीला जास्त गुण मिळालेल्यानी हरखून जाऊ नये. तसेच कमी गुण मिळालेल्यानी निराश होऊन निर्णय घेऊ नयेत. दहावीनंतरचा पुढचा प्रवास जिद्द, चिकाटी व भरपूर अभ्यासाचा आहे. त्यासाठी कष्ट करण्याची तयारी हवी. जास्त वेळ अभ्यासाची बैठक हवी. त्यासाठी स्वतःविषयी आत्मविश्वास हवा. हे असेल तर कोणत्याही अभ्यासक्रमात यशस्वी होता येते अशी अनेक उदाहरणे आपण आपल्या अवती भवती पाहत असतो.
दुसरा महत्वाचा भाग म्हणजे विद्यार्थ्यांचा कल जाणणे महत्वाचे असते. कल चाचणीतून विद्यार्थ्यांच्या क्षमता कळतात. त्यामधून विद्यार्थ्यांची बलस्थाने (Strong Points) व उणिवा (Weak Points) कळतात. तर अभिरुची मापन/आवड निवड (Interest Test) चाचणीने विद्यार्थ्यांची आवड निवड (Liking-Disliking) मोजली जाते. परंतु सध्या याबाबत गोंधळ दिसतो आहे. काहीजण कल(Aptitude Test) चाचणीला परीपूर्ण मानतात तर काही अभिरुची चाचणीला (Interest Test) परीपूर्ण मानतात. या चाचण्यांमधला समतोल राखत नाहीत. एखाद्या व्यक्तीची एखाद्या क्षेत्रात क्षमता आहे परंतु आवड नाही तर तो त्या क्षेत्रात जास्त काळ रमू शकणार नाही. तसेच एखाद्या व्यक्तीला एखाद्या विषयात आवड आहे परंतु त्या विषयात (क्षेत्रात) क्षमता नसेल तर तो त्या क्षेत्रात यशस्वी करिअर करू शकत नाही.

म्हणून करिअरचे क्षेत्र निवडतांना Aptitude Test आणि Interest Test दोन्ही चाचण्यांतून संकलित केलेल्या निष्कर्षावरून करिअर निवडीत नेमकेपणा आणता येतो. म्हणूनच कल मापन (Aptitude Test) व अभिरुची मापन (Interest Test) चाचणींना एका नाण्यांच्या दोन बाजू म्हणतात. मुलांना त्यांच्या क्षमता, आवडी-निवडी आणि कल योग्य वयात कळल्या, तर त्याचा त्यांना भविष्यात नक्कीच फायदा होतो. त्यासाठी प्रशिक्षित करिअर मार्गदर्शक व समुपदेशकाची (Career Guidance & Counselor) गरज असतेच. ते मानसशास्त्रीय आणि व्यक्तिमत्व जडण घडण विषयक आलेख काढून देतात. ते चाचणीतील निष्कर्ष जेव्हा पालक आणि मुलांना नीट समजावून सांगतात, त्यांच्या बारीक सारीक शंकांचे समाधान करतात, तेव्हाच कल चाचणीचे उद्दिष्ट खऱ्या अर्थाने साध्य होते.

मुलांना समजून सांगावयाचा गोष्टी –

# विद्यार्थ्यांची मानसिकता, बौद्धिक क्षमता, आवड, विचारशक्ती व सामाजिक वास्तवतेकडे पाहण्याचा दृष्टीकोन यांचा विचार प्रामुख्याने व्हावा.
# करिअर निवडतांना ग्लॅमरच्या मागे भुलून न जाता त्यामागील परिश्रम लक्षात घ्यावे.
# करिअरच्या कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी, धाडस व आत्मविश्वास हवा.
# करिअर मध्ये यश मिळवण्यासाठी मानसिक एकाग्रतेची गरज असते.
# करिअरसाठी क्षेत्र निवडतांना त्यात आवड असेल व त्यासाठी कष्टाची तयारी असेल तर यश आपोआप मिळते.
# कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर लोकांशी जुळवून घेणे, आपले म्हणणे इतरांना पटवून देणे. व्यक्तिमत्व विकास करून घेणे आवश्यक असते.
# नोकरी असो कि व्यवसाय तुम्ही त्या त्या क्षेत्रातील ज्ञान अद्ययावत ठेवले नाही तर तुम्ही स्पर्धेतून बाहेर फेकले जाल.
# स्पर्धेची जाण ठेवून निवडलेल्या क्षेत्रात नैपुण्य मिळवावे.

मार्गदर्शक-
डॉ. समिता प्रशांत चव्हाण
मानसशास्त्रतज्ञ, करिअर मार्गदर्शक व समुपदेशक

पत्ता-
संकल्प: ए सेंटर फॉर कॉम्पिटेन्सी असेसमेन्ट
322, गुरूदत्त अपार्टमेंट, दुसरा मजला,
विठ्ठल मंदिर जवळ, नवी पेठ, पुणे-३०
मो.- 7028896981/82

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.