India Corona Update : 24 तासांत 3.86 लाख नवे रुग्ण तर, जवळपास तीन लाख रुग्ण कोरोनामुक्त 

एमपीसी न्यूज – भारतातील कोरोना संसर्गाचा वेग दिवसेंदिवस वाढतच असून, उच्चांकी रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 86 हजार 452 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असून, गेल्या 24 तासांत जवळपास तीन लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 87 लाख 62 हजार 976 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 53 लाख 84 हजार 418 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 2 लाख 97 हजार 540 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 81.99 टक्के एवढा झाला आहे.

चिंताजनक बाब म्हणजे देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, सध्या 31 लाख 70 हजार 228 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 3 हजार 498 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 2 लाख 08 हजार 330 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.11 टक्के एवढा आहे‌.

देशात आजवर 28 कोटी 63 लाख 92 हजार 086 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 19 लाख 20 हजार 107 चाचण्या गुरुवारी (दि.29) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 15 कोटी 22 लाख 45 हजार 179 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी केंद्रीय मंत्रीमंळाची बैठक होणार आहे. देशात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा नरेंद्र मोदी आढावा घेणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.