Pune News : कॅश काढताना एटीएममधून डेबिट कार्डची अदलाबदली करून 1 लाख 30 हजार काढून घेतले

एमपीसी न्यूज : एटीएम मध्ये कॅश काढण्यासाठी गेला असताना चलाखीने डेबिट कार्डची आदलाबदली करून त्यातून 1 लाख 30 हजार रुपये काढून घेत आर्थिक फसवणूक करण्यात आली. वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जगताप चौक परिसरात 7 जून रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी माधव ज्ञानदेव धायगुडे (वय 61) यांनी फिर्याद दिली असून एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि त्यांचा मुलगा वानवडी येथील जगताप चौक परिसरात असणाऱ्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. परंतु तेथील एटीएम मधून पैसे निघत नव्हते. त्याचवेळी एटीएम मध्ये अज्ञात इसम आला. त्याने फिर्यादी यांना जवळच असणाऱ्या आयडीबीआय बँकेच्या एटीएम मधून पैसे निघत आहेत असे सांगितले. त्यामुळे फिर्यादी पैसे काढण्यासाठी आयडीबीआय बँकेच्या एटीएम मध्ये गेले.

दरम्यान फिर्यादी एटीएम मधून पैसे काढत असतानाच त्यांना पत्नीचा फोन आला. फोन उचलून बाजूला जाऊन पत्नीसोबत बोलत असतानाच त्यांच्या मागोमाग आलेल्या अज्ञात आरोपीने फिर्यादीचे एटीएम मध्ये असणारे डेबिड कार्ड घेऊन त्या जागी दुसरे डेबिट कार्ड ठेवले. त्यानंतर फिर्यादीच्या अकाउंट मधून एक लाख तीस हजार रुपये काढून घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.