Dr. S.R. Ranganathan : ग्रंथपालन शास्त्रास शास्त्रशुध्द विज्ञानाची जोड देणारे डॉ. एस.आर. रंगनाथन

एमपीसी न्यूज : 12 ऑगस्ट 1892 हा दिवस डॉ. एस.आर. रंगनाथन (Dr. S.R. Ranganathan) यांचा जन्म दिवस. त्यामुळे भारतात 12 ऑगस्ट हा राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. ग्रंथपालन शास्त्रास शास्त्रशुध्द विज्ञानाची जोड देणारे व भारतात आधुनिक ग्रंथालयाची चळवळ यशस्वीरित्या राबविणारे ते थोर ग्रंथपाल होते. भारतात सार्वजनिक व शैक्षणिक ग्रंथालय प्रणालीचा विकास झाला यात त्यांचे मोठे योगदान आहे.

ग्रंथालय सार्वजनिक असो अथवा शैक्षणिक ती एक समाज घडविणारी व राष्ट्रीय मुल्ये जपणारी एक संस्था असते. ग्रंथ हे गुरू आहेत वा ग्रंथ हे मित्र आहेत हे आपण बालपणापासूनच ऐकले आहे. योग्य मित्राची वा गुरूची निवड माणसाच्या आयुष्याचे परिस्पर्शाप्रमाणे सोने करते. अशा योग्य ग्रंथाची निवड करणे़ व योग्यवेळी वाचकांना देणे हे ग्रंथालयाच्या यशस्वीतेचे एकओळी सूत्र आहे.

माहिती़, ज्ञान, विकास, संशोधन व यशस्वीता याचा मार्ग ग्रंथालयाच्या दारातून जातो. वाचनाची आवड असणारे लोक ज्ञान जपतात़ व निर्माण करतात व आपले क्षेत्र समृद्ध करतात व ग्रंथालये हे ज्ञान पुढच्या पिढीला हस्तांतरीत करतात. त्यासाठी ग्रंथपाल ही जबाबदारी फार महत्त्वाची आहे. आजच्या ग्रंथपालास छापील पुस्तकांच्या बरोबरीने इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाईन पुस्तकेही संग्रही ठेवावी लागतात.

Rakshabandhan : आळंदीमध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरा

डॉ. रंगनाथन (Dr. S.R. Ranganathan) हे मूळ व्यवसायाने मद्रास विद्यापीठामध्ये गणिताचे प्राध्यापक होते. मुलांनी गणिताचा अभ्यास करावा म्हणून त्यांनी एकदा मुलांना ग्रंथालयातील गणिताची सर्व पुस्तके दाखविली. तेव्हा ग्रंथालयाच्या प्रभावाने त्यांचा अभ्यास वाढला. तेव्हापासून एक तळमळीचा शिक्षक एक तळमळीचा ग्रंथपाल होऊन गेला. पुढे विद्यापीठाने त्यांच्यावर ग्रंथालय संशोधन व विकासाची जबाबदारी दिली़. ती सार्थ ठरवित त्यांनी ग्रंथपालन शास्त्रास नवी दिशा दिली.

ग्रंथालयाची वाढ, विकास, गुणवत्ता व उपयोग यांना चालना देणारी जगमान्य पंचसूत्री जगाला दिली. ग्रंथ  हे बंदिस्त न ठेवता ते उपयोगात आले पाहिजेत. प्रत्येक वाचकाला त्याच्यासाठी उपयुक्त ग्रंथ मिळाला पाहिजे. प्रत्येक ग्रंथ वाचला गेला पाहिजे़. वाचकाला विनाविलंब त्याचा ग्रंथ मिळाल पाहिजे व ग्रंथालयाची वाढ व संग्रही साहित्याचा विकास झाला पाहिजे.

पंचसूत्रीतील ही तत्वे कालबधित असुन आजच्या हायटेक लायब्ररी 2.0 वा 3.0 च्या व्हर्जनलाही ती लागू होतात. आज पारंपारीक ग्रंथपाल यांनी कात टाकली असुन ग्रंथालयात Cloud Computing, IoT, Artificial Intelligence, RFID, robotics, drone- technology इ. टेक्नालॉजीचा शिरकाव झाला आहे.

ग्रंथपाालन हे व्यवस्थापन शास्त्राप्रमाणे कला व विज्ञान यांचा अंमल आहे. ती एक नोकरी नसून ती शैक्षणिक भूमिका, सामाजिक जबाबदारी व राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपल्या विदयार्थ्यांना वाचन साहित्याची माहीती देणे, वाचनाची आवड लावणे, ती वृद्धिंगत करणे, देशाचा जबाबदार नागरिक बनण्यास प्रवृत्त करणे ही ग्रंथपालाची व्यवसायिक जबाबदारी आहे.

त्यासाठी तो परंपरागत ते अदयावत साधनांचा उपयोग करण्यास तो सक्षम असला पाहिजे. कारण सोशल मिडीयाच्या युगातही वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज आहे. कारण ग्रंथालयाची पानेच आजच्या आणि उद्याच्या पिढीला स्वातंत्र्याचे, समतेचे, नात्यांचे, त्यागाचे, शौर्याचे, देशप्रेमाचे, जाज्वल्य इतिहासाचे बाळकडू देत राहतील.

– मीना डोंगरे, 

ग्रंथपाल

प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज,

चिंचवड, पुणे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.