Pune : पुणे महापालिका सभागृह नेते पदासाठी कोणाला संधी?

नगरसेवक धिरज घाटे, महेश लडकत, हेमंत रासणे यांची नावे चर्चेत

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत सभागृह नेतेपद हे अतिशय महत्वाचे असते. हे पद आपल्याच पदरात पाडून घेण्यासाठी भाजपचे नगरसेवक सक्रीय झाले आहेत. या पदासाठी नगरसेवक धिरज घाटे, महेश लडकत, हेमंत रासणे, नगरसेविका मंजुषा नागपुरे, आरती कोंढरे यांच्या नावाची चर्चा आहे. तर, युवा नेतृत्व म्हणून नगरसेवक दीपक पोटे आणि सुशील मेंगडे यांचाही नावाचा विचार होऊ शकतो.

कसबा मतदारसंघात घाटे, लडकत आणि रासणे प्रबळ दावेदार होते. त्यामुळे नेमकी कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे. स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनाही भाजपने राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यामुळे रासने यांची या पदावर निवड होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यसभेचे खासदार संजयनाना काकडे गटाच्या 30 नगरसेवकांना मागील 3 वर्षांत एकही मनाचे पद मिळाले नाही. त्यामुळे या गटाच्या नगरसेवकांना कोणते पद मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

‘पीएमपीएमएल’चे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनाही तातडीने राजीनामा देण्यास सांगितले आहे. हे पद सुद्धा महत्वाचे असून, त्याची निवड पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली जाते. सभागृह नेता आणि स्थायी समिती अध्यक्ष पक्षाच्या बैठकीत लवकरच निवडण्यात येणार आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यानंतर भाजपने वरील तिन्ही पदे बदलणार असल्याचे जाहीर केले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नवीन पदाधिकाऱ्यांची कसोटी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.