Pimpri : ‘प्रधानमंत्री कोणाला करायचे ?’ दानवे यांच्या प्रश्नावर भाजप कार्यकर्ते निःशब्द !

रावसाहेब दानवे म्हणतात, 'अशी भाजप नव्हती पहिली कधी' 

एमपीसी न्यूज – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचा आढावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज (शुक्रवारी) घेतला. तीन नोव्हेंबरला निगडीत होणारी सभा भव्य झाली पाहिजे. त्यामुळे लोकांना कळले पाहिजे की या मतदार संघात भाजपने बैठक का घेतली. 2019 ला या देशाचा पंतप्रधान कोणाला करायचे आहे ? असे दानवे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना प्रश्न केला असता कार्यकर्त्यांमध्ये भयाण शांतता पसरली. ‘कोणाचाच आवाज निघत नाही, अशी भाजप नव्हती पहिली, असे दानवे म्हणाले. त्यानंतर उपस्थितांनी मोदी यांचे नाव घेतले.

भाजपमध्ये आयारामांचा भरणा झाला आहे. राजकीय वारे बदलले की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील बडे नेते भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांप्रमाणे आयाराम कार्यकर्त्यांना भाजपची संस्कृती समजली नसल्याचे, यातून समोर आले आहे.

पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले, ‘आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने लोकप्रतिनीधी आणि पदाधिका-यांच्या बैठका सुरु केल्या आहेत. मतदार संघनिहाय आढावा घेतला जात आहे. युतीमध्ये मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघ शिवसेनेकडे आहे. परंतु, आम्ही पक्षसंघटना वाढविण्याचे काम करत आहोत. शिवसेनेने देखील भाजपचे खासदार असलेल्या मतदार संघात बैठका घेतल्या आहेत’.

‘युती व्हावी, अशी आमची इच्छा आहे. समविचारी पक्षांच्या मताची विभागणी होऊ नये या विचाराचे आम्ही आहोत. युतीच्या बैठका सुरु झाल्या नाहीत. युती झाल्यास भाजपच्या पक्ष संघटनेचा फायदा शिवसेनेला देखील होणार असल्याचे’ सांगत दानवे म्हणाले, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला चालले आहेत. त्यामुळे आम्ही आनंदी आहोत. कारण, मित्र पक्ष आमच्याच मार्गाने चालला आहे. आम्ही नशीबाच्या जोरावर कधीच निवडणुका लढविल्या नाहीत. संघटनेच्या जोरावर निवडणुका लढविल्या आणि जिंकल्या आहेत’, असेही ते म्हणाले.

‘मंत्रीमंडळ विस्तारात पिंपरी-चिंचवड शहराला संधी मिळेल का? असे विचारले असता दानवे म्हणाले, ‘मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. योग्य माणसाला मंत्रिपदी संधी दिली जाईल. त्याची प्रक्रिया सुरु आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.