BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : विषय समितीत कोणाची लागणार वर्णी; सोमवारी होणार सदस्यांची निवड

एमपीसी न्यूज–पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विषय समितीच्या सदस्यांची सोमवारी (दि. 20) महासभेत निवड होणार आहे. स्थायी समिती, प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी डावलल्या गेलेल्या नगरसेवकांनी विषय समिती संधी मिळावी यासाठी नेत्यांकडे ‘फिल्डिंग’ लावली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायी समिती व्यतिरिक्त विधी समिती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती, महिला व बालकल्याण समिती आणि शहर सुधारणा समिती अशा चार समित्या आहेत. या समितीतील सदस्यांची एका वर्षाची मुदत संपली आहे. त्यामुळे नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे.

महापालिकेची मे महिन्याची सर्वसाधारण सभा सोमवारी होणार आहे. या चारही समित्यांमध्ये नऊ सदस्य असतात. पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक सदस्य प्रत्येक समिती जाणार आहे. नव्या सदस्यांची निवड सोमवारी होणा-या महासभेत केली जाणार आहे. सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे बंद पाकिटातून समिती नियुक्त करण्यात येणा-या पक्षाच्या सदस्यांची नावे महापौर राहुल जाधव यांच्याकडे देतील. त्यानंतर महापौर जाधव सदस्यांची नावे वाचून समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याची जाहीर करतील.

दरम्यान, सदस्य निवडीनंतर सभापतीपदासाठी निवणूक घेण्यात येईल. विभागीय आयुक्तांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत सभापतींची निवड केली जाणार आहे. विषय समितीत संधी मिळावी, यासाठी नगरसेवकांनी नेत्यांकडे ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे.

HB_POST_END_FTR-A2