Maval : इच्छुकांमधील चुरशीने मावळची उमेदवारी गुलदस्त्यात

बंडखोरी टाळण्याकरिता पक्षश्रेष्ठींची खेळी

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा मतदार संघात इच्छुकांच्या चुरशीमुळे उमेदवारी जाहीर झालेली नाही. पक्षांतर्गत बंडखोरी टाळण्याकरिता पक्षश्रेष्ठींनी ही खेळी खेळल्याने उमेदवारी कोणाला मिळणार याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.

मावळ विधानसभा मतदार संघाचे मागील दहा वर्षापासून राज्यमंत्री बाळा भेगडे प्रतिनिधित्व करत आहेत. ते तिसर्‍यांदा या मतदार संघातून हॅट्रीक करण्याच्या तयारीत आहेत. राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर बाळा भेगडे यांनी मावळात मोठ्या प्रमाणात विकासनिधी आणला आहे. या कामाच्या बळावर त्यांनी तिसर्‍यांदा उमेदवारी मागितली आहे.

तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी मागील पाच वर्ष मावळात वैयक्तिक पातळीवर विकासकामे करत मावळच्या उमेदवारीवर दावा केला आहे. तिसरीकडे मावळ प्रबोधनीचे संस्थापक रवींद्र भेगडे यांनी मावळ तालुक्यात पंधरा वर्षापासून पक्षवाढीसाठी केलेली कामे व प्रबोधनीच्या माध्यमातून केलेली विकासकामे या जोरावर उमेदवारीवर दावा केला आहे.

भाजपा पक्षाने मावळात विविध पातळीवर जनमताचा कौल घेतला. यामध्ये प्रत्येक वेळेस वेगवेगळी नावे आघाडीवर आली, त्यातच इच्छुक तिन्ही उमेदवारांनी मावळात गणपतीचा मुहर्त साधत केलेल्या गावभेट दौर्‍यांना मिळालेला भरघोस प्रतिसाद यामुळे तिघांनी देखील उमेदवारीवर दावा केला आहे. तिन्ही इच्छुक हे मातब्बर विकासाभिमुख चेहरे असलेले असल्याने त्यांच्यापैकी एकाची निवड करणे पक्षाकरिता कसोटी ठरली आहे. महाराष्ट्रात भाजपाचे सर्वात मोठे व चांगले संघटन मावळ तालुक्यात असल्याने कोणत्याही इच्छुकांने बंडखोरी केल्यास ती पक्ष संघटनेकरिता नुकसानकारक ठरणार असल्याने भाजपाने महाराष्ट्रातील पहिल्या यादीत जाहीर केलेल्या 125 जणांच्या यादीत मावळचा समावेश केलेला नाही.

मावळ तालुक्यातील बंडखोरी रोखण्याकरिता पक्षश्रेष्ठींनी ही शक्कल लढवली असली तरी यामुळे इच्छुकांची चुरस वाढली असून तिन्ही इच्छुकांनी उमेदवारी मलाच मिळणार हा दावा केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.