Pune : पुणे जिल्ह्यातून मंत्री पदाची लॉटरी कोणाला लागणार?

चंद्रकांत पाटील यांना हमखास मंत्रिपद; माधुरी मिसाळ, राहुल कुल, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांची नावे चर्चेत

एमपीसी न्यूज – दिवाळीनंतर भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार स्थापन होऊन त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यातील क्रमांक 2 चे नेते चंद्रकांत पाटील यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यात राज्यमंत्री पदासाठी भाजपच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, राहुल कुल, भिमराव तापकीर यांच्या नावाची चर्चा आहे. आगामी काळात पक्ष मजबूत करण्यासाठी शहरात भाजपला राज्यमंत्री पद देण्याची मागणी जोर धरत आहे. जिल्ह्यात काँगेस – राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे.

पुणे शहरात वडगावशेरी, हडपसर, खडकवासला, पर्वती मतदारसंघांतही राष्ट्रवादीने चांगली मते घेतली आहेत. तर खडकवासला मतदारसंघात तापकीर यांचा केवळ 2500 मतांनी विजय झाला. पिंपरी आणि मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीने काबीज केले. त्यामुळे जगताप किंवा लांडगे यांना मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीने भाजपच्या ताब्यातील वडगावशेरी, हडपसर, मावळ, शिरूर, पिंपरी हे मतदारसंघ खेचून घेतले. शिवसेनेच्या ताब्यातील खेड – आळंदी मतदारसंघ राष्ट्रवादीने खेचून आणला. इंदापूरमध्ये माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा धक्कादायकरित्या पराभव केला. बारामती मतदारसंघांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळविला. आंबेगाव मतदारसंघात दिलीप वळसे पाटील यांनी सातव्यांदा विजय मिळविला. जुन्नरमध्ये शरद सोनवणे यांचा अतुल बेनके यांनी पराभव केला. पुरंदर तालुक्यात माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा काँगेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी 30 हजार मतांनी पराभव केला. भोर विधानसभा मतदारसंघात काँगेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी गड राखला.

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 10, तर काँगेसचे 2 आमदार झाले आहेत. शिवसेना जिल्ह्यातून हद्दपार झाली आहे. भाजपचे केवळ 9 आमदार आहेत. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी शिवसेना – भाजप पुणे जिल्ह्यात 2 ते 4 मंत्रिपद, महामंडळ देणार का? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. पुणे शहर आणि जिल्हात शिवसेनेची मोठी ताकद आहे. पण, एकही जागा न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर, पुणे शहरात शिवसेनेला एकही जागा भाजपने न दिल्याने शिवसैनिक नाराज आहेत. त्यावर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.