IPL 2021 : विजयादशमीच्या मुहूर्तावर विजयश्री कोणाला माळ घालणार?

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : करोनाच्या संकटातून मनाला जरासा तरी विरंगुळा देणारी आयपीएल स्पर्धेचा आज अंतिम सामना दुबई येथे होणार आहे. तीन वेळेस ही स्पर्धा जिंकणारा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दोनवेळा विजेते ठरलेले कोलकाता नाईट रायडर्स या दोन तुल्यबळ संघातला हा सामना नक्कीच रंगतदार आणि रोमहर्षक होईल, अशी आशा असंख्य क्रिकेट रसिकांना आहे.

एकीकडे सुपरकुल आणि तमाम भारतीय क्रिकेट रसिकांइतकाच जगभराचा लाडका माही विरुद्ध क्रिकेटच्या जनकाला पहिल्यांदा विश्वविजेता बनवणारा आयन मॉर्गन या दोन महान कर्णधार यांच्या इतकाच सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती विरुद्ध दीपक चहर, रवींद्र जडेजा, युवा शुभमन गील विरुद्ध युवा ऋतूराज गायकवाड असा ते 12 कोटी विरुद्ध सहा कोटीचा सामना (विजेते आणि उपविजेते बक्षिसे) असे अनेक कंगोरे या सामन्याचे असू शकतील.

20/20 हा असा खेळ आहे ज्यामध्ये भूतकाळात काय झाले याला काहीच अर्थ नसतो. आजच्या सामन्यात तुमच्या खेळाचा दर्जा किती उंचावतो यावर विजयाचे पारडे अवलंबून असते. एक षटक सामन्याचा निकाल बदलवू शकते हे आपण याआधी कित्येकदा अनुभवलेले आहेच. आजही तशीच अनुभूती अपेक्षित आहे.

चेन्नई संघ विजेतेपदासाठी जास्त प्रबळ दावेदार मानला जातोय कारण त्यांची फलंदाजी, सोबत कर्णधार महेंद्रसिंगचा अनुभव, नेतृत्वक्षमता यामुळे चेन्नईची बाजू वरचढ वाटत आहे. पण केकेआरकडे सुद्धा नव्या दमाचा वेंकटेश अय्यर शुभमन गील सह अनेक तगडे फलंदाज आहेत. त्यातच जर संघहीत डोळ्यासमोर ठेवून रसेलही फिट झाला तर केकेआरची बाजू आणखी बळकट होईल.

त्यामुळे हा सामना नक्कीच रोमहर्षक होईल अशी अपेक्षा असंख्य क्रिकेटवेडे बाळगून आहेत, तर आपणही तशीच अपेक्षा बाळगायला काय हरकत आहे, सांगा बरं!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.