Online Shopping Site : का बदलला ‘मिंत्रा’ने त्यांचा लोगो?
एमपीसी न्यूज : ई-कॉमर्स संकेतस्थळ असलेल्या मिंत्राने त्यांचा लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मिंत्रा या कंपनीचा लोगो हा महिलांसाठी आक्षेपार्ह आणि अपमानकारक असल्याची तक्रार एका महिलेने मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये दाखल केली होती. या तक्रारीमुळे कंपनीने त्यांचा लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
मिंत्राने आता त्यांचा नवीन लोगो प्रदर्शित केला असून नवीन आणि जुन्या लोगोमधे नक्की काय फरक केला आहे, याच्या चर्चा समाजमाध्यमांवर रंगल्या आहेत. या नवीन लोगोच्या रंगसंगतीमध्ये कंपनीने थोडा बदल केला आहे. आता ॲप, संकेतस्थळ, पॅकेजिंगचे सामान अशा सर्व ठिकाणी नवीन लोगो प्रिंट करण्याचे आदेश कंपनीकडून देण्यात आले आहेत.
मुंबईमधील अवेस्टा फाऊंडेशन या एनजीओमध्ये काम करणा-या सामाजिक कार्यकर्त्या नाज पटेल यांनी डिसेंबर 2020 मध्ये ही तक्रार दाखल केली होती. मिंत्राने लोगोमध्ये बदल केल्यावर त्यावर समाजमाध्यमांवर अनेक विनोद, मीम्स शेअर केली जाऊ लागली आहेत.