Trending News : ‘मोदी रोजगार दो’ हा हॅशटॅग सोशल मीडियावर का होतोय ट्रेन्डिंग ! 

एमपीसी न्यूज – कोरोना आणि त्यापार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले तर, कित्येकांचे रोजगार धोक्यात आले आहेत. बेरोजगारांची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या तरुणांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच रोजगाराची मागणी केली आहे. सोशल मीडियावर ‘मोदी रोजगार दो’ हॅशटॅग ट्रेन्ड होताना दिसत असून, लाखो लोकांनी हा हॅशटॅग वापरून ट्विट केलं आहे. 

भाजप सरकारने सत्तेत येताना दोन कोटी नोक-या उपलब्ध करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनाचं काय झालं ? असा प्रश्न उपस्थित करत अनेकांनी भाजप सरकारला धारेवर धरले आहे. कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देखील हा हॅशटॅग वापरून ट्विट केलं आहे. ‘सुनो जन के मन की बात’ असं ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच दुसऱ्या ट्विट मध्ये ‘फेल सरकार, महॅंगाई की मार, बेरोजगारी की सब हदें पार’ असं ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

ट्विटरवर ‘मोदी रोजगार दो’ हा हॅशटॅग वापरून जवळपास वीस लाख पेक्षा अधिक लोकांनी ट्विट केलं आहे. चौथ्या दिवशीही हा हॅशटॅग ट्वीटवर ट्रेन्डिंग आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीनुसार भारतात 47 टक्क्यांपर्यंत बेरोजगारी वाढली आहे. कोरोनामुळे बेरोजगारी वाढली आहे. एकीकडे आर्थिक संकट उभे आहे तर, रोजगार नसल्याने लोकांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच रोजगार मागितला आहे.

दरम्यान, 2019 च्या कम्बाईन ग्रेजुएट लेवल एक्झाम (CGL) या परिक्षेचा 19 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाला. त्यानंतर मोदी सरकार विरोधात सोशल मीडियावर हे कॉम्पेन सुरू झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.