Pimpri : स्मार्ट सिटीसाठी माहिती अधिकारी का नाही? – योगेश बाबर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत करोडो रूपयांची कामे सुरू आहेत, असे असताना महापालिकेमार्फत स्मार्ट सिटी कंपनीकरिता माहिती अधिकारी नेमण्यात आलेला नाही. या कंपनीद्वारे राबविण्यात येणा-या प्रकल्पांची माहिती लपवून कोणाचे आर्थिक हितसंबंध जपायचे आहेत, असा सवाल शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर यांनी केला आहे.  

पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटी या प्रकल्पाअंतर्गत क्षेत्रीय पायाभूत सुविधा (एरिया बेस डेव्हलपमेंट) या तत्वावर शहर विकसित करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत 1150 कोटींपेक्षा जास्त कामे होणार आहेत. स्मार्ट सिटी कंपनी ही महापालिका, राज्य सरकार, केंद्र सरकारची भागीदारी कंपनी आहे, असे असताना स्मार्ट सिटी संकेतस्थळावर माहितीचा अधिकार कायदा 2005 चा पर्याय ठेवलेला नाही. तसेच स्मार्ट सिटी कंपनीकरिता माहिती अधिकार अधिकारी नेमण्यात आलेला नाही.

त्यामुळे या कंपनीद्वारे राबविण्यात येणा-या प्रकल्पांची माहिती लपवून कोणाचे आर्थिक हितसंबंध जपायचे आहेत. कंपनीच्या कामकाजाची माहिती ही माहिती अधिकार कायद्यान्वये सार्वजनिकरित्या त्वरीत उपलब्ध करावी. तसेच माहिती अधिकारी त्वरीत नेमावा, अशी मागणी बाबर यांनी स्मार्ट सिटीचे सीईओ श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.