Talegaon dabhade : गंगा पेपर मिल मधील ‘त्या’ कामगाराचा अपघात का ‘घातपात’?

मृत कामगाराच्या कुटुंबीयांनी केली सखोल चौकशीची मागणी

एमपीसी न्यूज  – मावळ तालुक्यातील बेबेड ओहळ येथील गंगा पेपर मिल या कंपनीत 1 सप्टेंबर 2020 रोजी एका कामगाराचा मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला. हा प्रकार घातपाताचा असल्याचा आरोप मयत कामगाराच्या नातेवाईकांनी केला आहे. कंपनी संचालक आणि अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृत कामगाराच्या कुटुंबीयांनी रविवार (दि 13) पत्रकार परिषदेत केली आहे.

पत्रकार परिषदेला महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष प्रदीप नाईक, मयत कामगार अनुकूल यांची पत्नी मानसी लाहा,  मुलगी सोनिया लाहा उपस्थित होत्या.

अनुकूल अनिल लाहा (वय 43, रा. बेबडओहळ, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. त्यांची पत्नी मानसी अनुकूल लाहा आणि मुलगी सोनिया अनुकूल लाहा यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश तसेच महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप नाईक यांना याप्रकरणी निवेदन दिले असल्याचे सांगितले.

मानसी लाहा व सोनिया यांनी सांगितले  की, मयत कामगार अनुकूल लाहा हे बेबडओहळ येथील गंगा पेपर मिल या कंपनीत फर्स्ट असिस्टंट या पदावर सन 2006 पासून काम करत होते. त्यांची आणखी 15 वर्षे सेवा शिल्लक होती. ते कंपनीत प्रामाणिकपणे काम करत होते.

कामगारांवर लक्ष ठेवणे, कामगारांकडून काम करून घेणे हे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. कंपनीने तांत्रिक बिघाड अथवा अन्य बाबींसाठी फिटर कामावर असतानाही 1 सप्टेंबर 2020 रोजी मशीन बंद पडल्याने अनुकूल यांना सायलो टँककडे पाठवण्यात आले. त्यानंतर त्यांचा टँकमध्ये पडून मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात ‘अनुकूल यांचा मृत्यू सायलो टँकमध्ये पडून फॅन, पंपामध्ये अडकून झाला असावा’ अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

अनुकूल लाहा यांचा मृतदेह आम्हाला दाखविण्यात आला नाही. खूप प्रयत्न केल्यानंतर मृतदेह दाखविण्यात आला, मात्र तो ओळखता येण्याच्या स्थितीत नव्हता. त्यामुळे अनुकूल यांचा मृत्यू अपघाताने नव्हे तर घातपाताने झाल्याचा संशय आम्हां कुटुंबीयांना आला  असल्याचे त्यांनी सांगितले.

अनुकूल यांचा मृत्यू झाला त्यावेळी कंपनीत फिटर हजर होता. असे असताना अनुकूल सायलो टँकची पाहणी करण्यासाठी एकटे गेले ही संशयाची बाब आहे. त्यामुळे कंपनीचे प्लांट मॅनेजर द्विवेदी, जनरल मॅनेजर गांगोली, पर्सनल मॅनेजर यतीन द्विवेदी, प्रोडक्शन मॅनेजर दिनेश मिश्रा आणि तीन कामगार यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

तसेच अनुकूल यांच्यामागे पत्नी, मुलगी आणि आई असा परिवार आहे. घरात सर्व महिला असून कुटुंबाने कर्ता पुरुष गमावला आहे. ऑन ड्युटी मृत्यू होऊन देखील कंपनी या प्रकरणी कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार नाही. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले असता अपमानास्पद वागणूक देऊन हाकलून देण्यात येते. व्यवस्थापनाकडून धमक्याही देण्यात येत आहे. त्यामुळे कुटुंबातील कोणाच्याही जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी कंपनीला जबाबदार धरण्यात यावे, असेही या कुटुंबाने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कंपनीकडून नुकसान भरपाई मिळेपर्यंत अनुकूल यांच्या कुटुंबियांना कंपनीच्या परिसरातील घरात राहू द्यावे, अशी मागणीही कुटुंबीयांनी यावेळी केली आहे. महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनीही  पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांची भेट घेऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी साकडे घातले. याबाबत पत्रकार परिषदेत  सांगितले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.