Wakad: ….तर आम्ही कर का भरायचा?

आयटीयन्सचा महापालिका प्रशासनाला सवाल

एमपीसी न्यूज -पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने गेली अनेक वर्षांपासून वाकड, विशालनगर परिसरातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी नाही, कचरा उचलला जात नाही. मग, आम्ही कर का भरायचा? असा सवाल करत पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने आज (शनिवारी) महापालिकेवर निषेध मोर्चा काढला. तसेच सुविधा पुरवा अन्यथा यंदाचा मिळकत कर भरणार नाही, असा इशारा देखील आयटीयन्सनी प्रशासनाला दिला आहे.

या नगरसेवक मयुर कलाटे, सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे, सुदेशराजे देशमुख, तेजस्वीनी ढोमसे, सुधीर देशमुख सचिन लोंढे यांचा समावेश होता.

हिंजवडीतील आयटी कंपन्यांमधील हजारो आयटीयन्स वाकड आणि विशालनगर परिसरात वास्तव्यास आहेत. या परिसरातून महापालिकेच्या करसंकलन विभागाला 87 ते 90 कोटींचा महसूल मिळतो. मात्र, तरी देखील गेली अनेक वर्षांपासून वाकड आणि विशालनगर परिसरात नागरी सुविधांचा वाणवा आहे. पाणी टंचाईमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. याशिवाय या उच्चभ्रू परिसरातील सोसायट्यांमधून गोळा केला जाणारा ओला आणि सुका कचरा पुन्हा एकत्र केला जात असून, त्याची नेमकी कशाप्रकारे विल्हेवाट लावली जाते, याची वारंवार मागणी करूनही माहिती दिली जात नाही.

त्यामुळे त्रस्त झालेल्या आयटीयन्सनी पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून महापालिकेवर धडक मारली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर समस्यांचा पाडा वाचला. महापालिका नागरी सुविधा देत नाही. पाणी देत नाही, कचरा उचलला जात नाही. मग, आम्ही कर का? भरायचा असा संतप्त सवालही त्यांनी आयुक्तांना केला.

त्यावर आयुक्‍त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”शहरातील पाण्याचा प्रश्‍न मिटविण्यासाठी महापालिकेला आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातील हक्काचे राखीव कोट्यातील पाणी मिळणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागेल. तसेच या प्रश्नांबाबत दहा दिवसांनी बैठक घेतली जाईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.