Pune News : पतीने केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू; पुण्याच्या भवानी पेठेतील घटना

एमपीसी न्यूज : घरगुती वादातून पतीने केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भवानी पेठेतील गुलटेकडी परिसरातून आज सकाळी ही घटना उघडकीस आली. आसमा हवारी असे मृत्युमुखी पडलेल्या पत्नीचे नाव आहे. खडक पोलिसांनी याप्रकरणी पती तौसिफ हवारी याला ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवारी पती-पत्नी यांच्यात सातत्याने वाद होत होते. मुलं सतत भांडण करतात त्रास देतात यावरून पत्नी तौसिफकडे तक्रार करायची. सोमवारी रात्री देखील पत्नीने त्याच्याकडे मुलांची तक्रार केली होती. यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात तौसिफने पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व तिचे डोके भिंतीवर आदळले. त्यानंतर काही वेळाने सर्व कुटुंबीय झोपी गेले.

दरम्यान आज सकाळी पत्नी उठत नसल्याचे पाहून तौसिफ तिला उठवण्यासाठी गेला. बराच वेळ झाला तरीही ती उठत नव्हती. तिचे अंग देखील गार झाले होते. यावेळी तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच खडक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल असे पोलिसांनी सांगितले. खडक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.