Wild Life Photography by Sharvari Kate: व्याघ्रप्रेमी शर्वरी

एमपीसी न्यूज (देवदत्त कशाळीकर) – खेळण्या बागडण्याचं वय, आई वडिलांकडे हट्ट करून लाड पुरवून घेण्याचं वय, त्यात घरातील सुखवस्तू स्थिती व ‘लाडकी लेक’ असं असून सुद्धा  केवळ आठवी इयत्तेत शिकणारी शर्वरी या सर्व चौकटीच्या बाहेरची आहे. पिंपळे सौदागरमधील चॅलेंजर पब्लिक स्कूलची, काटे परिवारात जन्मलेली शर्वरी मात्र अगदी लहानपणापासून ‘वाघ वेडी’ आहे. म्हणजे  काय तर, भटकंती करायची, फोटो काढायचे, निरीक्षण करायचं आणि त्यात वरून वाघावर अधिक प्रेम!

शर्वरीने बाराव्या वर्षी जवळपास  सर्व व्याघ्र अभयारण्ये पालथी घातली आहेत. तासन्तास  अवजड कॅमेरा, भल्या मोठ्या लेन्स सकट हातात  धरताना मोठ्या माणसांची जिथे दमछाक होते, तिथे शर्वरी मात्र तासन्तास न कंटाळता कॅमेरा सरसावून जंगल सफारी करते.

वाघ दिसण्याआधी सांबर, अन्य प्राणी एक विशिष्ट आवाज काढतात. तो जर आपल्या कानावर पडला तर जवळ कुठेतरी वाघ आहे, हे निश्चित होते.  शर्वरीचे कान यासाठी सुद्धा एव्हाना तयार झाले आहेत.

वाईल्ड लाईफ फोटोग्राफी म्हणले की, जो प्रचंड संयम असावा लागतो, तो शर्वरीकडे खूप मोठ्या प्रमाणात आधीच आहे. अभ्यासातही एकपाठी असलेली शर्वरी मितभाषी आहे. शर्वरीचे वडील शशी काटे हे देखील उत्तम हौशी फोटोग्राफर आहेत व ते क्रिकेट अकादमीचे संचालक आहेत.

वडील अभयारण्यात जात असताना शर्वरीने बाबांना एकेदिवशी सांगितले की, मला मोठं होऊन इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे आणि मोठी अधिकारी बनून बाबांना सफारी फ्रीमध्ये द्यायची आहे. शर्वरी एवढं बोलून थांबली नाही तर तिने संपूर्ण लॉकडाऊनमध्ये त्याबाबतचा अभ्यासही सुरु केला.

ताडोबा हे तिचे फेव्हरेट ठिकाण आहे. अजिबात कुरकुर न करता, भल्या पहाटे पाच वाजता उठून सहा वाजता जंगलाच्या प्रवेशद्वारावर पोहोचणे,  मग पुढे सलग चार तास डोळ्यात तेल घालून वाघावर लक्ष ठेवणे. जंगलातील प्राण्यांबद्दल खडान् खडा माहिती ठेवत, कान टवकारून जंगल न्याहाळत राहणे, हे तिच्या वयाच्या मानाने अजिबात सोपे काम नाही. असे असतानाही सकाळी व संध्याकाळी मिळून आठ-आठ तास सलग हाच उपक्रम करणे यातून तिची जिद्द दिसते.

चंद्रपूरचा कडक उन्हाळा, 45 अंश सेल्सियसच्या वर असलेले तापमान, या कशाचीही तमा या पोरीच्या चेहऱ्यावर दिसत नाही. कधी कधी सलग दोन दिवस, म्हणजे सोळा तास फिरूनही वाघाची साधी शेपूटसुद्धा नजरेला पडत नाही. अशा वेळी सुद्धा शर्वरी निर्विकार असते, याचे विशेष कौतुक वाटते.

फोटो काढताना कॅमेऱ्याचे तांत्रिक मुद्दे विचारात घेऊन शर्वरी अचूकपणे क्षण टिपते. शर्वरी चिंचवडमधील देवदत्त फोटोग्राफी स्कूलमध्ये फोटोग्राफी शिकली असून फोटोग्राफी शिकणारी ती या स्कूलमधील आजपर्यंतची सर्वात लहान विद्यार्थिनी आहे. संपूर्ण परिसरात सध्या शर्वरीच्या गुणांचे व फोटोंचे कौतुक होताना दिसत आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.