Shirur:उद्योगांचे अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी चाकण एमआयडीसीतील कंपन्यांना सहकार्य करणार- डॉ. कोल्हे

will co-operate with companies in chakan MIDC to streamline the economic cycle of the industry says mp dr amol kolhe

एमपीसी न्यूज- लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर उद्योगांचे अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी चाकण एमआयडीसीतील कंपन्यांना कामगार उपलब्ध करून देण्यासह विविध समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार, अशा शब्दांत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आश्वस्त केले.

ते आज (दि.1) फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज (एफसीआय) समवेत आयोजित केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलत होते.

एका बाजूला लॉकडाऊन शिथिल करून कंपन्या सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली असताना दुसऱ्या बाजूला राज्यातील व परराज्यातील हजारो कामगार त्यांच्या घरी परत गेले.

त्यामुळे कंपन्यांना पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. शिवाय सतत बदलणारा कन्टेन्मेंट झोन लक्षात घेता उपलब्ध कामगारांना कामावर येताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, एमआयडीसी व कामगार उपायुक्त कार्यालय आदींकडून योग्य माहिती व मार्गदर्शन कंपन्यांना मिळावे.

तसेच त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांच्या पुढाकाराने आज फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या सदस्य कंपन्यांच्या प्रतिनिधींची व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल, पुण्याचे कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ, खेडचे प्रांत अधिकारी संजय तेली, एफसीआयचे दिलीप बटवाल, मोहन पाटील तसेच विविध कंपन्यांचे आदी उपस्थित होते.

कंपन्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी डॉ. कोल्हे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल सर्वच कंपनी प्रतिनिधींनी आनंद व्यक्त करताना त्यांच्यासमोर अनेक समस्या मांडल्या.

यामध्ये प्रामुख्याने बाहेरून येणाऱ्या कामगारांचे १४ दिवस विलगीकरण करण्याची अट, बाहेरगावी गेलेल्या कायमस्वरूपी कामगारांना परत येण्यासाठी पोलीस परवानगी मिळण्यात येणारे अडथळे व पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध न होणे आदींचा समावेश होता.

या सर्व प्रश्नांवर कामगार उपायुक्त श्री. पोळ, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी श्री. हदगल तसेच खेडचे प्रांत अधिकारी श्री. तेली यांनी समर्पक उत्तरे व माहिती देऊन मार्गदर्शन केले.

एफसीआय व प्रशासन यांच्यात माहिती व शासनाचे वेळोवेळी निघणारी परिपत्रके व दररोज बदलणाऱ्या कन्टेन्मेंट झोनची माहिती यांचे आदानप्रदान करण्यासाठी एफसीआयने नोडल अधिकारी नियुक्त करावा असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी एफसीआयला आवश्यक सहकार्य करण्यासाठी आपल्या वेबसाइटवर एक प्लॅटफॉर्म तयार करून स्थानिक परिसरातील व महाराष्ट्रातील विविध भागांतील तरुणांकडून अर्ज मागविले जातील.

हे अर्ज एफसीआयच्या माध्यमातून कंपन्यांना पाठवले जातील. त्यातून कंपन्यांनी आपल्याला आवश्यक उमेदवारांची निवड करावी. या माध्यमातून मनुष्यबळाचा प्रश्न सोडवू शकतो या डॉ. कोल्हे यांच्या सूचनेचे सर्वच कंपनी प्रतिनिधींनी स्वागत केले.

येत्या दोन-तीन दिवसांत आपल्या वेबसाइटवर यासाठी प्लॅटफॉर्म तयार करून देण्याचा आपला प्रयत्न राहिल असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी उद्योगांचे अर्थचक्र सुरळीत करण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे “पुनश्च हरी ओम” म्हणत आपल्याला अर्थव्यवस्था रुळावर आणण्याला प्राधान्य देण्याचे सुतोवाच केले आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. कोल्हे यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच आपण सातत्याने एकमेकांच्या संपर्कात राहून तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.