Pimpri: समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?; महापौर, विरोधी पक्षनेतेपद समाविष्ट गावात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या च-होली, चिखली, जाधववाडी गावाच्या लोकप्रतिनिधींकडे पालिकेतील महत्वाची पदे आली आहेत. महापौर, विरोधी पक्षनेते, महिला व बालकल्याण समिती यासह समाविष्ट भागातील काही सदस्य स्थायी समितीचे सदस्यही आहेत. त्यामुळे आता तरी समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे थांबून तेथील विकासाला चालना मिळणार का, अशी चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात होत आहे.

चिखली, जाधववाडी, च-होली, दिघी, बोपखेल हा भाग सन 1997 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झाला. महापालिकेत समाविष्ट होऊन 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या भागाला महापालिकेतील महत्वाचे पद मिळाले नव्हते. तसेच हा भाग नेहमीच विकासापासून वंचित राहत होता. त्यामुळे या भागाचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी वारंवार विकास कामाबाबत आवाज उठवित होते. समाविष्ट गावात विकास कामे केली जात नसल्याचा आरोप वारंवार केला जात होता.

2014 ची विधानसभा निवडणुक अपक्ष लढवलेल्या आमदार महेश लांडगे यांना सामाविष्ट गावातून मोठे मताधिक्य मिळाले होते. याची परतफेड म्हणून त्यांनी समाविष्ट गावातील नगरसेवकाला महापौर केले. पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपचा पहिला महापौर समाविष्ट गावाचा केला होता. च-होलीचे प्रतिनिधित्व करणारे नितीन काळजे यांच्या माध्यमातून समाविष्ट गावाला पहिल्यांदाच समाविष्ट गावाला पालिकेतील सर्वांत महत्वाचे पद मिळाले होते. काळजे यांनी देखील पदाचा पुरेपुर लाभ उचलत च-होलीचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यकाळात समाविष्ट गावात 425 कोटी रुपयांची रस्ते करण्यास मंजुरी मिळाली असून रस्त्यांची कामे देखील सुरु आहेत. त्यामुळे समाविष्ट गावात रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे.

सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर काळजे यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला असून त्यांचे उत्तराधिकारी समाविष्ट गावातीलच जाधववाडीचे प्रतिनिधित्व करणारे राहुल जाधव होणार आहेत. शहराच्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून त्यांचा एकमेव अर्ज भरण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची निवड निश्चित असून सलग दुस-यावेळी समाविष्ट गावाकडेच शहराचे महापौरपद असणार आहे. 2012 मध्ये नगरसेवक असताना जाधव समाविष्ट गावातील प्रश्नांवर नेहमी आक्रमकपणे प्रश्न मांडत होते. आता तेच शहराचे प्रथम नागरिक होणार असून त्यांनी समाविष्ट गावातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे.

महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद देखील चिखलीचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता साने यांच्याकडे आहे. त्याचबरोबर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वीनल म्हेत्रे या देखील समाविष्ट गावातील आहेत. त्यामुळे आता तरी समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे थांबून तेथील विकासाला चालना मिळणार का, अशी चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.