Pune : महापालिकेच्या शाळांबाबत चर्चा करणार – महापौर

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका शाळांच्या इमारतींमधील वर्गखोल्या खाजगी शिक्षण संस्था आणि सामाजिक संस्थांना भाडेपट्ट्याने देताना, धोरणनिश्चिती करण्यासाठी येत्या महिनाभरात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन चर्चा करून निर्णय घेणार, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले.

माध्यमिक शाळांमधील वर्गखोल्या भाडेपट्ट्यावर न देता, भाडेपट्ट्याच्या मोबदल्यात संबंंधित संस्थेने पालिकेच्या शाळांमधील आणि अल्प उत्पन्न गटातील ५० टक्के विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत प्रवेश द्यावा, या अटीवर दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पेस एज्युकेशन ट्रस्ट मुंबई या संस्थेला १० वर्षाच्या कालावधीसाठी बनकर शाळेतील वर्गखोल्या देण्याबाबतचा विषय मंगळवारी सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी आला होता.

यावेळी झालेल्या चर्चेत शहरातील इतर शाळांमधील वर्गखोल्या खाजगी संस्थांना देताना संबंधित नियमांची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला़. तसेच केवळ एका शाळेपूरता हा विषय न आणता संपूर्ण शहरातील माध्यमिक शाळांमधील वर्गखोल्या देताना काय नियम असावा याची आखणी करावी, अशी मागणीही अनेकांनी केली़. यावर महापौरांनी सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे जाहीर केले. नगरसेवकांच्या चर्चेनंतर हा ठराव फेब्रुवारीच्या कार्यपत्रिकेवर घेण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.