Pimpri News: मोशी कचरा डेपोतील डंपिंग कचऱ्याचे ‘बायोमायनिंग’; 44 कोटीच्या खर्चाला ‘स्थायी’ची आयत्यावेळी मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करुन तो टाकला जाणा-या मोशी कचरा डेपोतील जुन्या डंपिंग केलेल्या कच-याचे ‘बायोमायनिंग’  करण्यात येणार आहे. याबाबतचे काम हिंद ऍग्रो अँड केमीकल्स कंपनीला 43 कोटी 80 लाख रुपयांना देण्याच्या आयत्यावेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आज (बुधवारी) एकमताने मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज पार पडली. यामध्ये 177 कोटी 78 लाख रुपयांच्या 63 विषयांना मान्यता देण्यात आली.

मोशी कचरा डेपोतील जुन्या डंपिंग केलेल्या कच-याचे बायोमायनिंग  करण्याबाबत महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने निविदा मागविली होती. त्यामध्ये चार जणांनी सहभाग घेतला. त्यातील हिंद ऍग्रो अँड केमीकल्स कंपनीची सर्वात कमी दराची 44 कोटी रुपयांची निविदा प्राप्त झाली होती.

त्यांना आणखी दर कमी करण्याबाबत पत्राद्वारे विचारणा केली. कामाचे स्वरुप व बाजारातील इंधनाचे वाढते दर, इतर कामांच्या वाढत्या किंमती लक्षात घेता या कामासाठी 43 कोटी 80 लाख इतका अंतिमत: सुधारित दर दिला आहे.

या कामाचे प्रकल्प सल्लागार टंडन अर्बन सोल्युशन यांनी 5 फेब्रुवारी 2021 च्या अहवालानुसार बाजारभावाशी तुलना करुन व इतर महापालिकेतील दराशी तुलना करता सदरचा दर योग्य व वाजवी असल्याचा अहवाल दिला आहे.

त्यानुसार कमी दराची हिंद ऍग्रो अँड केमीकल्स कंपनीला 43 कोटी 80 लाख रुपयांना काम देण्यात आले आहे. त्यांच्यासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.