Pune : …तर साहित्य चळवळीला उत्तेजन मिळेल – प्रा. तुकाराम पाटील

एमपीसी न्यूज – शहरात वाचन, संशोधन याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. सुसज्ज ग्रंथालयाचा अभाव आहे. साहित्यिक चळवळही मंदावली आहे. साहित्य चर्चा, परिसंवाद, समीक्षा, कार्यशाळा, वाचन चळवळ यांचे आयोजन केल्यास साहित्य चळवळीला उत्तेजन मिळेल, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांनी आकुर्डी येथे व्यक्त केले.

नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या सभागृहात साहित्य संमेलन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी महापौर आर. एस. कुमार, अड. भास्करराव आव्हाड, नगरसेवक सुरेश भोईऱ, अनुराधा गोफणे, खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल काळभोर, मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव, माधुरी ओक आदी उपस्थित होते.

साहित्य संमेलनादरम्यान स्थानिक कवींच्या कवितांचे तयार केलेले मोरया गोसावी साहित्य दालन संमेलनाचे वैशिष्ट्य ठरले. पुस्तक प्रदर्शन भरविले होते. राज अहेरराव यांच्या शब्दवेड या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रा. पाटील पुढे म्हणाले, सामान्यांचे जगणे सध्या जिकिरीचे झाले आहे. शेतक-यांची अवहेलना होत आहे. विज्ञानाने निर्माण केलेल्या भोगावादी सुधारणांच्या हव्यासापोटी माणसाची मनशांती व सहनशीलता  हरवली आहे. जीवन प्रवाही व शांततामय व्हावे. यासाठी साहित्यिकांनी मार्गदर्शक साहित्य निर्मिती केली पाहिजे.

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, शहराचा भौतिक विकास करतान सांस्कृतिक पातळीवरदेखील विकास आवश्यक आहे. श्रम, अध्यात्म आणि शब्द संस्कृतीचा संगम साहित्य संमेलनांतून होतो. सध्या साहित्य संमेलन हे इव्हेंट व्हायला लागले आहे. त्यामुळे त्यातील आत्मा हरवत आहे.

यावेळी संमेलनाच्या नवोन्मेष या स्मरणिकेची माहिती नंदकुमार मुरडे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज अहेरराव यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र घावटे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.