Bopkhel News : मैलाशुद्धीकरण प्रकल्पासाठी न्यायालयात जाणार – विकास डोळस

एमपीसी न्यूज – बोपखेलमधील मैलाशुद्धीकरण प्रकल्पावरुन महापालिका प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मैलाशुद्धीकरण प्रकल्पावरुन प्रशासन दुजाभाव करीत आहे, असा आरोप करीत नागरिकांच्या हक्कांसाठी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा भाजपाचे माजी नगरसेवक विकास डोळस यांनी दिला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त व प्रशासक राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मैलाशुद्घीकरण प्रकल्प कार्यान्वयीत करणाऱ्यात हलगर्जीपणा करणाऱ्या सोसायट्यांवर कारवाई करण्याचे आदेश आपण महापालिका प्रशासनाला दिले आहेत. शहरातील पर्यावरण संवर्धन आणि नागरी आरोग्याच्या दृष्टीने आपल्या भूमिकेचे स्वागत करावे लागेल. प्रशासक म्हणून आपली भूमिका धडाकेबाज आहे. मात्र, मैलाशुद्धीकरण प्रकल्पाबाबत प्रशासनचा सोसायटीधारकांना एक न्याय आणि स्वत: मात्र कोरडे पाषाण अशा भूमिकेत अधिकाऱ्यांना एक न्याय… असा दुजाभाव का केला जातोय? याचे आश्चर्य वाटते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत बोपखेल समाविष्ट होऊन सुमारे 20 वर्षे झाली. मात्र, आजही गावात विविध पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. एका बाजूला संरक्षण विभागाची हद्द आणि दुसऱ्या बाजुला नदी यामुळे गावच्या विकासात अनेक अडथळे होते. मात्र, भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात अनेक रस्ते आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का?

निविदा प्रक्रिया रद्द केल्यानंतर पहिली, दुसरी आणि आता तिसरी निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर वाया गेलेला वेळ आणि वाढणारा खर्च याबाबत आपण संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार आहेत का? किंवा हजलर्गीपणा केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करणार आहेत का? हेसुद्धा प्रशासक म्हणून जाहीर करावे, असे आव्हान विकास डोळस यांनी दिले आहे. तसेच, प्रशासक राजवट लागू झाल्यामुळे आपण शहराचे पालक आहात. बोपखेलवर झालेला अन्याय हा चुकीचा आणि असंवैधानिक आहे. राष्ट्रवादीच्या म्हणण्यानुसार निविदा प्रक्रिया चुकीची असेलत ती रद्द करावी आणि नव्याने निविदा राबवून प्रकल्पाचे काम मार्गी लावावे, अन्यथा बोपखेलकरांच्या हक्कासाठी आम्ही न्यायालयीन लढा उभारणार आहोत, असेही डोळस यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.