Pune : …अन्यथा महापौर आणि आयुक्तांच्या कार्यालयात गडकरी यांचा पुतळा बसवू – ब्राह्मण महासंघाचा इशारा

एमपीसी न्यूज- तीन वर्षांपूर्वी पुण्यातील संभाजी बागेत असणारा राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडने हटवला होता. त्यानंतर हा पुतळा संभाजी बागेतच बसवण्यात येईल, असे आश्वासन पुणे महापालिकेच्या वतीने देण्यात आले होते. परंतु अद्याप हा पुतळा बसवण्यात आला नाही. महिनाभरात गडकरींचा पुतळा सन्मानपूर्वक बसवला नाही तर महापौर आणि आयुक्तांच्या कार्यालयात गडकरींचा पुतळा बसवू असा इशारा ब्राह्मण महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.

कवी आणि नाटककार राम गणेश गडकरी यांची आज पुण्यतिथी आहे. ब्राह्मण महासंघाच्या वतीने आज संभाजी उद्यानातील पुतळा हटवलेल्या ठिकाणी हार घालून महापालिकेचा निषेध करण्यात आला. गडकरींचा पुतळा बसवण्यात यावा या मागणीसाठी ब्राह्मण महासंघाच्या वतीने मागील तीन वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येतो.

परंतु संभाजी बागेत गडकरींचा पुतळा बसवण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध आहे. परंतु संभाजी बागेतील इतर कोणत्याही जागेत गडकरींचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली. त्या मागणीची आठवण करून देण्यासाठीच ब्राह्मण महासंघाने आज पुतळ्याच्या जागी हार घालून निषेध केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.