Nigdi News : बाहेर आल्यावर सोडणार नाही; पोलीस उपनिरीक्षकाला धमकी

पोलीस चौकीसमोर राडा घालत पोलिसांना धक्काबुक्की; एकास अटक

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गेलेल्या पत्नीला समजावून सांगणाऱ्या पतीने पत्नीचा गळा दाबला. त्यावेळी त्या दोघांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना गळा दाबणाऱ्या व्यक्तीने धक्काबुक्की केली. त्यानंतर पोलीस चौकीत राडा घालून पोलीस उपनिरीक्षकाला बाहेर आल्यावर सोडणार नाही, अशी धमकी दिली. याबाबत एकास अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. 1) रात्री दोन वाजता यमुनानगर पोलीस चौकी येथे घडली.

सुरज असकर चौधरी (रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक उत्तम ओमासे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरज हा त्याच्या पत्नीसह विशाल प्रकाश पंडित यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी यमुनानगर पोलीस चौकीत आला होता. विशाल पंडित यांच्या विरोधात तक्रार का देत नाही म्हणून समजून सांगण्यासाठी आरोपी सुरज याने त्याच्या पत्नीला चौकीच्या बाहेर नेले. तिथे त्याने पत्नीचा गळा दाबला. त्यावेळी पत्नीने आरडाओरड केली.

महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून चौकीतील फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक ओमासे आणि मार्शलचे कर्मचारी बाहेर आले. पोलिसांनी आरोपी याच्या पत्नीला सुरजच्या तावडीतून सोडवून चौकीत नेले. त्यावेळी सुरज याने पोलीस उपनिरीक्षक ओमासे आणि पोलीस नाईक मुळे यांच्याशी झटापट करत त्यांना धक्काबुक्की केली. पोलीस चौकीतील टेबलवर बसून खिडकीच्या काचा फोडल्या. स्वतःच्या हाताने काचा गळ्यावर मारून स्वतःला जखमी करून घेतले. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यास फिर्यादी उपनिरीक्षक ओमासे यांना बाहेर आल्यावर सोडणार नाही, अशी धमकी दिली. याबाबत पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करत आरोपी सुरज चौधरी याला अटक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.