Pune : …तर मी राजकारणातून संन्यास घेईन – आमदार टिळेकर

एमपीसी न्यूज -निवडणुकीच्या तोंडावर माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र सुरू असून, माझ्यावर दाखल झालेला गुन्हा सिद्ध झाला तर मी राजकीय संन्यास घेईन असे भाजप आमदार आणि भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार योगेश टिळेकर यांनी म्हटलं आहे.

मतदार संघात फायबर ऑप्टीकलचे कामे करताना धमकी आणि त्रास देवुन दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी फोनव्दारे 50 लाखाच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात भाजपचे आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे यांच्याविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा राजकीय षडयंत्राचा भाग असून यात पोलिसांची भूमिकाही संशयास्पद आहे. याप्रकरणात मी मदतीच्या हेतूने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, असे टिळेकर म्हणाले. दरम्यान, पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही टिळेकर यांनी सांगितले.

आमदार टिळेकर यांच्यावर रविंद्र लक्ष्मण बराटे (55, रा. सरगम सोसायटी, धनकवडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कलम 385,379,427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

7 ऑगस्ट ते  7 सप्टेंबर दरम्यान कात्रज कोंढवा रोड या भागात फिर्यादीच्या कंपनीचे फायबर ऑप्टीक केबलचे काम चालु असताना आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि त्यांचा हस्तक गणेश कामठे यांनी वारंवार फोन करून व समक्ष भेटून त्यांच्या मतदार संघात फायबर ऑप्टीकचे काम करण्यासाठी वायर तोडणे, चोरून नेणे, धमकी देणे तसेच इत्यादी प्रकारे त्रास दिली. त्यांनी 7 सप्टेंबर रोजी फोनव्दारे 50 लाखाची खंडणी मागितली आहे.

फिर्यादी हे इ व्हीजन टेलि इन्ट्रा प्रा.लि. (मेंहदळे गॅरेज, एरंडवणा) येथे नोकरीस असुन ते पुणे शहरातील दक्षिण विभागात एरिया मॅनेजर म्हणुन काम करतात. कंपनीतर्फे शहरातील विविध पोलिस पोलिस ठाण्याचे इंटरनेट फायबर ऑप्टीक केबल मार्फत जोडण्याचे तसेच खासगी व्यक्ती व आय टी आय पार्क यांना शुल्क आकारून सेवा पुरविण्याचे काम केले जाते.

दरम्यान, फिर्यादीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हयाचा पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.

एकीकडे येवलेवाडी विकास आराखड्यात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांना आमदार योगेश टिळेकर यांना विरोधकांनी घेरले असताना आता या खंडणीची गुन्हाने त्यांच्या अडचणीत  आणखीनच वाढ झाली आहे. तर भाजपच्या आमदाराविरोधात एवढा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.