Akurdi News : धान्य वाटपात गैरकारभार आढळल्यास कायदेशीर कारवाई : दिनेश तावरे

एमपीसीन्यूज : अन्नधान्य वितरण विभागाचे अ व ज परिमंडळ अधिकारी तथा नायब तहसिलदार दिनेश तावरे यांनी परिमंडळ हद्दीतील रास्तभाव दुकानदारांना भेटी देऊन धान्य वितरणाची माहिती जाणून घेतली. दुकानदारांकडून शिधा पत्रिकाधारकांना निर्धारित कोट्यानुसार नियमित व मोफत धान्य धान्य पुरवठा होत आहे की नाही याची शहानिशा केली. दरम्यान, धान्यवाटप प्रक्रियेत गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित दुकानदारविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा परिमंडळ अधिकारी तावरे यांनी दिला आहे.

गेल्या महिनाभरापासून तावरे आणि त्यांच्या पथकाने सुमारे 90 रास्त भाव दुकांनांना भेटी देत धान्य वितरण प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. यावेळी सहायक पुरवठा अधिकारी हेमंत भोकरे , पुरवठा निरीक्षक तुषार नावडकर, रविकुमार शेटे, अनिता शिनगारे व स्नेहल गायकवाड आदी उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यात दक्षता समिती सदस्य वैभवी घोडके, संजय धुतडमल, नुर रसूल खान, राजेंद्र कर्नावट यांनी सहकार्य केले.

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अंत्योदय योजना व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य सरकार व केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मे व जून हे दोन महिने मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. या धान्य वाटप प्रक्रियेत काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी अ व ज परिमंडळ अधिकारी तथा नायब तहसिलदार दिनेश तावरे यांनी बिजलीनगर, दळवीनगर, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, आकुर्डी येथील रास्त भाव दुकानांना अचानक भेट देत प्रत्यक्ष धान्य वितरण होत असताना पाहणी केली.

त्यावेळी दुकानदाराकडून धान्य वाटपात कोणताही काळा बाजार होत नसल्याचे निदर्शनास आले. दरम्यान पुढेही नागरिकांना संशय आल्यास किंवा काळाबाजार होत असल्यास आमच्याकडे तक्रार करावी. आम्ही स्वतः तक्रारीची शाहनिशा करून दोषी आढळणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करू, असा इशारा परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांनी दिला आहे.

धान्य मिळत नसल्याबाबत बहुतांश तक्रारी केशरी शिधापत्रिका धारकाकांडून ( एपीएल कार्ड धारक) करण्यात आल्या आहेत. मात्र, अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी असलेल्या केशरी शिधा पत्रिका धारकांनाच सरकारकडून धान्याचा कोटा आला असून त्याचे वाटप सुरु आहे. जे केशरी शिधापत्रिका धारक या योजनेचे लाभार्थी नाहीत त्यांना धान्य वाटप केले जात नाही, असे परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.