Maval : भाजपमधील उमेदवारीची ‘फायनल मॅच’ अखेरच्या क्षणापर्यंत रंगणार? बाळा भेगडे यांची हॅटट्रिक की नव्या चेहऱ्याला संधी?

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीचा अंतिम सामना अखेरच्या क्षणापर्यंत रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विद्यमान आमदार व राज्यमंत्री बाळा भेगडे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळणार की पक्षश्रेष्ठी नव्या चेहऱ्याला पसंती देतात, याबाबतची मावळच्या जनतेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राज्यमंत्री भेगडे यांची उमेदवारी निश्चित असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून छातीठोकपणे सांगण्यात येत असले तरी उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असणारे तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके व भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे हे दोघे शेवटच्या टप्प्यात एकत्र आले आहेत. नवीन चेहऱ्याला संधी देण्यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींना साकडे घातले आहे.

केंद्रीय मंत्री व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची सुनील शेळके व रवींद्र भेगडे यांनी एकत्र भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय झाला आहे. नवीन चेहऱ्याला संधी दिल्यास त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आपण घेऊ, असे माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी दानवे यांना सांगितले.

राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विषयी पक्षश्रेष्ठींचे मत चांगले आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्ताराच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली. बाळा भेगडे यांच्या कामगिरीबाबत नाराजी असती तर त्यांना ती संधीही मिळू शकली नसती. पक्ष संघटनेतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बाळा भेगडे यांच्या पाठीशी आहेत. त्यांना उमेदवारी नाकारण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे कोणतेही कारण नाही. त्यामुळे त्यांनाच तिसऱ्यांदा उमेदवारी मिळेल, असा विश्वास बाळा भेगडे समर्थकांकडून व्यक्त होत आहे. पक्षश्रेष्ठी दोन्ही प्रमुख इच्छुकांशी बोलून चांगला राजकीय तोडगा काढतील अशी आशा त्यांना वाटत आहे.

गेल्या पाच वर्षात केलेले कार्य, तळागाळापर्यंत वाढविलेला जनसंपर्क व निवडून येण्याची क्षमता या सर्व बाबींची दखल घेऊन पक्षश्रेष्ठी नवीन चेहऱ्याला नक्की संधी देतील, असा विश्वास सुनील शेळके व रवींद्र भेगडे यांना वाटत आहे. मावळात नवा चेहरा देण्याची भाजपची परंपरा आहे, याकडेही ते लक्ष वेधतात.

तिन्ही प्रमुख इच्छुकांची राजकीय महत्वाकांक्षा प्रबळ असल्याने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. दोन ऑक्टोबरपर्यंत उमेदवाराचे नाव जाहीर होईल, असे भाजपचे वरिष्ठ नेते सांगत असले तरी निर्णय अवघड असल्याने तो शेवटच्या क्षणापर्यंत लांबणीवर टाकला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.