Pune : पुणेकरांना 17 टीएमसी पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणार – धीरज घाटे

सभागृह नेतेपदाचा पदभार स्वीकारला

एमपीसी न्यूज – पुणेकरांच्या हक्काचे 17 टीएमसी पाणी मिळावे, यासाठी राज्य शासन आणि पाटबंधारे खात्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे नवनियुक्त सभागृह नेते धीरज घाटे यांनी सांगितले. बुधवारी घाटे यांनी सभागृह नेतेपदाचा पदभार स्वीकारला.

सभागृह नेतेपदी नियुक्तीचे पत्र महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घाटे यांना दिले. याप्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, आमदार व भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार योगेश टिळेकर, मावळते सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक हेमंत रासने, भारतीय जनता पार्टी प्रदेश चिटणीस राजेश पांडे व सभासद, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धीरज घाटे म्हणाले, पुणेकरांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी आवश्यक ती आकडेवारी सादर करून ते पाणी पुणेकरांना मिळणारच आहे, यासाठी माझे प्रयत्न असतील. गरज पडली तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सद्यस्थिती समजावून सांगू. भामा – आसखेड धरणातून पूर्व पुण्याला दोन टीएमसी पाणी मिळणार आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

पुणेकरांच्या रोजच्या जगण्यातील अडचणी कमी करून त्यांचे जगणे अधिक सुकर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पाणी आणि वाहतूक विषयातील अडचणी कमी व्हाव्यात, यासाठी भारतीय जनता पक्ष म्हणून जोमाने काम करू. ‘सब का साथ, पुणे का विकास’ हे माझ्या कामाचे सूत्र असेल, असेही घाटे यांनी सांगितले. सर्वपक्षीय नगरसेवक आणि महापालिकेतील सर्व अधिकारी यांच्या सहकार्याने पुणे शहराला विकासाच्या मार्गावर वेगाने मार्गस्थ करणे यासाठी प्रयत्नशील असेल.

‘पीएमपीएमएल’ च्या नवीन बसेस आणि मेट्रोमुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतील ’स्मार्ट पुणे’ साकारण्याचा आणि वेळेत योजना पूर्ण करण्याला प्राधान्य असेल, असेही घाटे यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.