Pimpri: शहर विकासाठी वैभवशाली काम करणार; नियोजित महापौर राहुल जाधव

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांला महापौरपदी काम करण्याची संधी दिली आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरविणार असून पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात वैभवशाली काम करणार असल्याचे, नियोजित महापौर राहुल जाधव यांनी सांगितले. माझे राजकीय दैवत महेश लांडगे यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याचे काम मी येणा-या काळात करेल, असेही ते म्हणाले. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून भोसरीतील नगरसेवक राहुल जाधव तर उपमहापौर पदासाठी चिंचवड मतदार संघातील सचिन चिंचवडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची निवड निश्चित असून शनिवारी (दि.4) होणा-या विशेष सर्वसाधारण सभेत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल जाधव पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे, सभागृह नेते एकनाथ पवार उपस्थित होते. 

आमदार महेश लांडगे म्हणाले, भाजपमध्ये कोणतेही गट-तट नाहीत. ख-या ‘ओबीसी’ला न्याय दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. 

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, महापौर, उपमहापौरपदासाठी सर्वानुमते अर्ज भरण्यात आला आहे. राहुल जाधव दुस-यांदा निवडून आले आहेत. पालिका कामकाजाचा त्यांना चांगला अनुभव आहे. उपममहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेले सचिन चिंचवडे देखील चांगले कार्यकर्ते आहेत. भाऊसाहेब भोईर सारख्या बलाढ्य नेत्याला पराभूत करुन ते निवडून आले आहेत. दोन्ही उमेदवार तरुण आणि सुशिक्षित असून त्याचा शहराला फायदा होईल. 

नियोजित उपममहापौर सचिन चिंचवडे म्हणाले, महापौरांना सहकार्य करण्यात येईल. विकासाठी कटिबद्ध राहील

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.