Pimpri Crime News : वाईनशॉप मधील वाद; ग्राहकाला मारहाण केल्याप्रकरणी वाईनशॉप मालकाच्या मुलासह कामगारांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी मधील रिगल वाईन शॉपमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी वाईन शॉप मालकाने चार दिवसांपूर्वी फिर्याद दिली होती. त्याच्या परस्पर विरोधात ग्राहकाच्या बाजूने देखील फिर्याद नोंदवण्यात आली आहे. त्यानुसार वाईन शॉप मालकाच्या मुलासह कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बडेलाल राम मनोहर यादव (वय 70, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी शनिवारी (दि. 23) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रिगल वाईनशॉपच्या मालकाचा मुलगा आणि त्याचे दोन ते तीन कामगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अमित आणि त्यांचे दोन मित्र दस-याच्या दिवशी रिगल वाईन शॉपमध्ये दारू खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यांनी 700 रुपयांची दारू खरेदी केली. 500 रुपये रोख आणि 300 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. फिर्यादी यांच्या मुलाने आरोपींना 100 रुपये जास्त दिले.

दरम्यान, ते पैसे मागत असताना वाईन शॉप मालकाचा मुलगा, कामगार आणि फिर्यादी यांचा मुलगा आणि त्याच्या मित्रांमध्ये वाद झाला. आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाच्या डोक्यात रॉडने व लाथाबुक्क्यांनी मारून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

यापूर्वी 19 ऑक्टोबर रोजी वाईन शॉप मालक कीर्ती लक्ष्मण राजपूत (वय 28, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.